एस.एस.जी.एम कनिष्ठ महाविद्यालयास शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन समितीकडून ‘अ’ श्रेणी मानांकन

एस.एस.जी.एम कनिष्ठ महाविद्यालयास शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन समितीकडून ‘अ’ श्रेणी मानांकन

कोपरगाव विजय कापसे दि ८ जानेवारी २०२६:- रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. कनिष्ठ महाविद्यालयास नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात दिवशी ७ जानेवारी, २०२६ रोजी संस्थेने गठीत केलेल्या ‘शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन’ समितीने भेट दिली. समितीचे प्रमुख दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, उपप्राचार्य जयदीप खेतमाळीस सर यांचे सह इतर ७ सदस्यांची समिती गठित केलेली होती. या सर्वांनी मिळून कनिष्ठ महाविद्यालयाची एकूण २० मुद्द्यांच्या आधारे सूक्ष्म तपासणी केली. समितीसमोर फिजिक्स विषयाचे प्रमुख रविंद्र हिंगे यांनी ज्युनिअर विभागातील सर्व उपक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केलेल्या प्रयत्नांपासून तर एकूणच शैक्षणिक वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा समितीने घेतला. यामध्ये शिष्यवृत्ती, निकाल, शिक्षक प्रशिक्षण, शास्त्रीय प्रयोग, पर्यावरण शिक्षण, स्वाध्याय, शारीरिक शिक्षण, स्वच्छतागृह व्यवस्था, सहशालेय उपक्रम, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, अभिलेख जतन, सीईटी / नीट / जेईई प्रवेश परीक्षा इ. विषयांसंबंधी पुराव्यासहित निरीक्षण नोंदविण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, क्रीडांगण आणि एकूणच परिसराला भेटी देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी देखील हितगुज करण्यात आले. तसेच पथक प्रमुख प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी महाविद्यालयास शालेय मूल्यांकन मानके तपासणी अंती १०० पैकी ९७ गुण देत ‘अ श्रेणी’ जाहीर केली. त्याचप्रमाणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ‘डेंटल हायजिन ॲण्ड ओरल हेल्थ अवेअरनेस’ कार्यक्रम अंतर्गत घेतलेल्या ऑनलाईन यु ट्यूब लाईव्ह सेमिनारसाठी उपस्थित प्रेक्षकांचा जागतिक विक्रम नोंदवण्यात आला. ही बाब संस्थेसाठी, महाविद्यालयासाठी गौरवास्पद आहे, असे प्रतिपादन प्राचार्य नगरकर साहेबांनी केले.

महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी अभिनंदन पर मनोगतात, ” या यशाचे सर्व श्रेय उपप्राचार्य शिंदे एस.एस, कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यवेक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचेच आहे.” असे प्रतिपादन केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हॉ. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. संदीप वर्पे, चैतालीताई काळे, विवेक कोल्हे, सुनील गंगुले, महेंद्रशेठ काले, बाळासाहेब आव्हाड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, कार्यालय अधीक्षक, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी आदींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. 



