बुद्धीमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा – आ. आशुतोष काळे
बुद्धीमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा – आ. आशुतोष काळे
कोपरगाव येथे १० वी १२ वी च्या गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि ९ जून २०२४ :- आपल्या देशातील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर व ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार आहे. माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन स्व.डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता होण्याचे स्वप्न पहिले आहे. देशाला महासत्ता करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यामुळे आपण यापुढील काळात ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्या क्षेत्रात आपल्या बुद्धीमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा असा मौलिक सल्ला आ.आशुतोष काळे यांनी १० वी १२ वीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविलेल्या गुणवंतांना दिला.
कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ईयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, गुणवंतांच्या यशामध्ये सर्व पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे देखील मोठे योगदान असून ते देखील अभिनंदनास पात्र आहेत. दहावी बारावी हि जीवनाची सुरुवात असून या वयामध्ये अनेक मन विचलित करणाऱ्या बाबी असतात यामध्ये सोशल मीडियाचा देखील मोठा वाटा आहे.मात्र कुठल्याही प्रकारचे बंधन नसतांना देखील गुणवंतांनी आपल्या मनाला आवर घालून मिळविलेले यश निश्चितपणे अभिमानास्पद आहे. भावी जीवनात देखील अशा मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहून यश संपादित करा व आपले उज्वल भविष्य घडवा. शिकून मोठे जरूर व्हा त्याच बरोबर या देशाचा आदर्श नागरीक होवून देशाच्या प्रगतीसाठी आपल्या अलौकिक बुद्धीचा उपयोग करा आणि आपल्या कोपरगावचे व आपल्या पालकांचे नाव उज्वल करा अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक म्हणाले की, ज्याप्रमाणे दहावी बारावीच्या पेपर वर पुढचे आयुष्य अवलंबून असते त्याप्रमाणे सिनेसृष्टीतील प्रत्येक प्रोजेक्टवर कलाकारांचे पुढचं आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे सिनेसृष्टीमध्ये जे ग्लॅमर दिसतं, सगळं चमचमीत चंदेरी दिसत, झगमगाट दिसतो त्यावर मोहित होवून या क्षेत्राची निवड करू नका.कुठल्याही क्षेत्रापेक्षा या क्षेत्रातील प्रवास जरा जास्तच खडतर आहे. मुलांना काय वाटतं, कशात करिअर करावं व त्यांचा कल काय आहे? हे पालकांनी बघणं महत्त्वाचं आहे त्यामुळे पालकांनी मुलांच्या मागे न लागता मुलांच्या मागे उभे राहिले पाहिजे. माझ्या पाठीमागे माझे पालक उभे राहिले म्हणून मी तुमच्यापुढे उभा आहे.शिक्षक,आई वडील यांना गुरु मानून त्यांच्या प्रती आयुष्यभर श्रद्धा ठेवा तुम्हाला नक्की यश मिळणार. दहावी आणि बारावी हा आपल्या कारकिर्दीचा करिअरचा पाया असतो. तुमच्या कुटुंबाला तुमच्या शाळेला तुमच्या गावाला तुमचा नितांत अभिमान वाटेल अशी कामगिरी करा अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आशुतोष काळे सामान्य माणसांचे प्रेम लाभलेले आमदार
आ. आशुतोष काळे यांना तीन पिढ्यांचा समाज कारणाचा वारसा लाभलेला आहे. स्वत: उच्च विद्या विभूषित असूनही आपल्या मायभूमीत परत येवून देशाच्या, राज्याच्या व कोपरगावच्या विकासासाठी समाजकारण करीत आहे याचा मला अभिमान वाटतो. रस्ते, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केलेलं काम वाखाणण्याजोगे आहे. ते सामान्य माणसांचे प्रेम लाभलेले आमदार आहे. हे प्रेम त्यांना कायम लाभणार आहे. कारण ते कायम काम करीत राहणार आहे.त्यांचे विचार खूप उच्च असून आपला देश महासत्ता कसा होईल याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन पाहता असे विचार उच्च शिक्षित असलेल्या माणसांचेच असतात त्यामुळे असे विचार आ.आशुतोष काळे यांचे आहेत.
प्रसाद ओक (अभिनेता, दिग्दर्शक)