हजारो भाविकांच्या उपस्थितीत आत्मा मालिक ध्यान पिठात गुरुपौर्णिमा उत्सव सुरु
हजारो भाविकांच्या उपस्थितीत आत्मा मालिक ध्यान पिठात गुरुपौर्णिमा उत्सव सुरु
गुरुत्वाचे ध्यान करण्याचा सोहळा म्हणजे गुरुपौर्णिमा – संत परमानंद महाराज
कोपरगाव विजय कापसे दि १७ जुलै २०२४ : ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ जे ध्यान युगाने युगे प्रत्येक धर्माच्या परंपरेत सांगत निर्गुण निराकार विश्वात्मक सद्गुरू सत्येने अनंत अवतार धारण करुन निर्गुणाची पुजा करीत सगुण निर्गुणाचे गुरूतत्व पुजण्याचा व त्यांच्या संदेशाचे ध्यान करण्याचा सोहळा म्हणजेच गुरुपौर्णिमा सोहळा आहे असे विचार आत्मा मालिक ध्यान योग मिशन चे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी व्यक्त केले.
आत्मा मालिक ध्यान पिठ व आत्मा मालिक ध्यान योग मिशन कोकमठाण यांच्या वतीने गुरू पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात आले आहे. सलग पाच दिवस सुरु असलेल्या या सोहळ्याचा शुभारंभ आज पासुन २१ जुलै २०२४ पर्यंत होणार आहे. या गुरूपौर्णिमा महोत्सवात राज्यासह देश विदेशातील लाख भाविक सहभागी होतात. आषाढी एकादशीला दिवशी सुरु झालेल्या या महोत्सवात बोलताना संत परमानंद महाराज पुढे म्हणाले की, सद्गुण निर्गुणाचे असणारे गुरुतत्व पुजण्याचा, चिंतन करण्याचा व ध्यान करण्याचा दिव्य योग आषाढी वारीच्या निमित्ताने आपणास प्राप्त झाला आहे. वारीचा नियम केला देहाला दंड देण्यासाठी आणि देहाला दंड देत देत देवत्वाला अर्थात आत्म्याला पहाण्यासाठी सद्गुरूंनी हाच महामंत्र आपल्याला दिला आहे. गेल्या तीन तप हा गुरूपौर्णिमा सोहळा अविरत येथे सुरु आहे. या वर्षीचा गुरुपौर्णिमा उत्सव आषाढी वारीच्या महापर्वाच्या काळावर सुरु झाला असुन समस्त विश्वाच सद्गुरू तत्व हे सर्वांच्या हृदयात आहे त्या गुरुतत्वाची हि गुरुपौर्णिमा म्हणजे आत्मा मालिक सद्गुरू पौर्णिमा आहे. सद्गुरू माऊलींनी दिलेला ध्यानमार्ग व वृत्ताचा अवलंब करणे म्हणजेच सद्गुरुंच्या चरणी खरी गुरु दक्षिणा आहे. तेव्हा तमाम भाविक भक्तांनी या गुरूपौर्णिमा सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संत परमानंद महाराज यांनी केले.
या गुरूपौर्णिमा सोहळ्या बद्दल अधिक माहीती देताना आत्मा मालिका ध्यान पिठ व आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हणाले की, या गुरु पौर्णिमा उत्सवाला देश विदेशातून अंदाजे दिड लाख भाविक येण्याची शक्यता आहे. उत्सव काळात दिवसभर विविध आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहेत. येणाऱ्या भाविकांची निवास, भोजनाची चोवितास सेवा करण्यात आली आहे. आत्मा मालिक ध्यान पिठाच्या प्रशासनाने भाविकांच्या सर्व सुविधांसह सुरक्षेची व्यवस्था केली आहे.आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज सह अनेक संतगण, आश्रमाचे सर्व विश्वस्त यांच्या सहभागातून या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा सोहळा आत्म पुजनाचा आहे. सद्गुरू माऊली जो संदेश देतात की परमेश्वर प्रत्येकांच्या हृदयात विराजीत आहे तोच आपला अंतिम गुरु आहे. त्या गुरुचा शोध प्रत्येकांनी ध्यानाच्या माध्यमातून घ्यायचा . हा ध्यान मार्गाचा सोहळा आणि सद्गुरूंनी दिलेल्या मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी हा उत्सव साजरा केला आहे असेही सुर्यवंशी यांनी सांगितले.
आत्मा मालिक ध्यानपिठात गुरुपौर्णिमा महोत्सवाची जय्यत तयारी झाली असुन अखंड अन्नदान , महाप्रसाद मोफत केला आहे. प्रसाद म्हणुन १ लाख बुंदीचे लाडू वाटप करण्याची व्यवस्था केली आहे. भाविकांच्या गर्दीने कोकमठाण परिसर फुलुन गेला आहे. भाविकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.