एस.एस.जी.एम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे तहसीलदार भोसलेच्या हस्ते उद्घाटन
एस.एस.जी.एम महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे तहसीलदार भोसलेच्या हस्ते उद्घाटन
नियोजनबद्ध अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चित यश– तहसीलदार भोसले
कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२४ – कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे नुकतेच उद्घाटन पार पडले. या उद्घाटन तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संपन्न झाले.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी ‘स्पर्धा परीक्षा व युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात तहसीलदार भोसले म्हणाले की, “राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या वतीने विविध पदांच्या नियुक्त्या होत असतात. या स्पर्धा परीक्षेमध्ये नियोजनबद्ध अभ्यास केल्यास निश्चित यश प्राप्त होते. तसेच सोशल मीडियाचा विद्यार्थ्यांनी विधायक वापर करावा. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. मानसिक व शारीरिक संतुलनासाठी अभ्यासाबरोबरच व्यायामही महत्त्वाचा आहे. तसेच महावियालयीन विद्यार्थ्यांनी युवा संवाद दिन व मतदार नोंदणी अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा”.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी, महाविद्यालयीन युवक व युवतींनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून स्पर्धा परीक्षेस सामोरे गेले तर यश मिळणे सोपे होते, त्यासाठी त्याला वाचन, चिंतन व तंत्रज्ञानाची जोड देणे महत्त्वाचे आहे.याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या अद्ययावत अभ्यासिका व सुसज्ज ग्रंथालयाचा उपयोग करावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी कोपरगावचे मंडल अधिकारी मच्छिंद्र पोकळे, कोपरगावचे तलाठी योगेश तांगडे, महाविद्यालयाच्या कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. वैशाली सुपेकर प्रा. डॉ. रंजना वर्दे, प्रा. डॉ. योगेश दाणे, प्रा. किरण पवार ,प्रा. गोरक्ष नरोटे, प्रा. अश्विनी पाटोळे, प्रा. रोहिणी डिबरे यांसह सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा प्रमुख प्राध्यापक संजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील काकडे यांनी केले.तर आभार प्रा. डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले.