शिर्डीत एकदिवसीय सौंदर्य स्पर्धा मोठ्या जल्लोषात संपन्न
ताराराणी मल्टीस्टेट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या वतिने आयोजन
शिर्डी प्रतिनिधी दि ११ ऑगस्ट २०२४– महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास मंडळ व ताराराणी मल्टीस्टेट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने शिर्डी येथे आयोजित भव्य एक दिवसीय सौंदर्य क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व सौंदर्य स्पर्धा अहमदनगर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या दोनशेहून अधिकच्या सौंदर्य क्षेत्रात कार्य करत असलेल्या स्पर्धकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.
या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय अधिकारी अलोक मिश्रा, अहमदनगर जिल्हा प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवढे, श्री केदारेश्वर आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ताराराणी मल्टीट्रेड कंपनीचे सर्वेसर्वा भाऊसाहेब वाघ यांनी बोलताना सांगितले की, संपूर्ण जगभरात त्वचेशी निगडित असणारा ब्युटी पार्लर हा व्यवसाय असून या व्यवसायाला आता आधुनिकतेची जोड मिळाली असल्याने दिवसेंदिवस या व्यवसायाची व्याप्ती वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ब्युटी पार्लर क्षेत्रात कार्य करत असणाऱ्या महिलांना देखील या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी नवनवीन तंत्रज्ञान त्यांना अवगत व्हावे या उद्देशाने ताराराणी मल्टीटेड कंपनीने आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच शासनातर्फे ब्युटी पार्लर क्षेत्रातील महिलांकरीत असलेल्या स्वयंरोजगाराच्या संधी तसेच मिळत असलेल्या सबसिडीच्या वेगवेगळ्या योजनांची देखील आपल्याला या शिबिरात माहिती दिली जाणार असल्याचे वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
याप्रसंगी हेअर कट हेअर केमिकल या संदर्भात राष्ट्रीय पातळीवर नावजलेले नाना सूर्यवंशी व सचिन सूर्यवंशी यांनी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देत प्रात्यक्षिक सादर केले तर महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास मंडळाच्या थ्री टायर सिस्टीम ची ओळख करून दिली.
प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवढे यांनी बोलताना सांगितले की, शासनाच्या सीएनजीपी सह इतर योजनेमधून ब्युटी पार्लर क्षेत्रात स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी ३५ ते ५० टक्के पर्यंत सबसिडी मिळू शकते. त्यामुळे शासनाच्या या योजनेचा आपण जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन तात्यासाहेब जिवढे यांनी करत उपस्थित सर्व महिलांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दुपारच्या सत्रात नाशिक येथील आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट प्राजक्ता मुळे यांनी अतिशय सुंदर मेकअप केलेल्या मॉडेलचे रॅम्प वॉक संपन्न होऊन कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील सारेगमप लिटिल चॅम्पची विजेती गौरी पगारे हिने आपल्या गाण्यातून उपस्थितांची त्यांची मने जिंकली. तर या प्रसंगी ताराराणी मल्टी ट्रेड च्या वतीने मीनल कुलकर्णी, स्वाती गोडसे व गौरी पगार यांना जीवनगौरव व समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती गोडसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ताराराणीच्या संचालिका जयश्री रोहमारे यांनी व्यक्त करताना सांगितले की, अनेक दिवसापासून ब्युटी पार्लर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याची इच्छा होती आज ती पूर्ण झाली असून ती ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या सर्व शासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच उपस्थित सर्व ब्युटी पार्लर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मी आभार व्यक्त करते.