राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी – पणन मंत्री अब्दुल सत्तार
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी – पणन मंत्री अब्दुल सत्तार
शिर्डी एमआयडीसीत एक हजार कोटींची गुंतवणूक – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील: राहाता बाजार समितीला २५ एकर जमीन हस्तांतरीत
शिर्डी प्रतिनिधी दि १२ ऑगस्ट २०२४ (उमाका) – राहाता व शिर्डी परिसरात डाळींब व फुलांचे चांगले मार्केट आहे. तेव्हा या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित रहावा यासाठी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी रूपये मंजूर करत आहे. अशी घोषणा राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे केली. त्याबरोबर आगामी काळात बाजार समितीत शेतकरी भवन बांधण्यासाठी दीड कोटी रूपये मंजूर करण्यात येतील. अशा शब्दात पणनमंत्री श्री.सत्तार यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
साकुरी- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पणन, अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, उप सभापती आण्णासाहेब कडू पाटील, उपनिबंधक गणेश पुरी, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर आदी उपस्थित होते.
पणनमंत्री श्री.सत्तार म्हणाले की, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजसाठी ११ कोटी रूपये मंजूर करण्यात येतील. यात ६ कोटींचे अनुदान असणार आहे. याचठिकाणी शेतकरी भवनासाठी दीड कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. या शेतकरी भवनाच्या भूमिपूजनासाठी मी स्वतः उपस्थित राहील.असेही त्यांनी सांगितले. कृषीमंत्री असतांना सावळी विहीर येथील कृषी विभागाची ७५ एकर जमीन पशु वैद्यकीय महाविद्यालयासाठी पशुसंवर्धन विभागाकडे हस्तांतरित केली. याची आठवणही पणनमंत्री श्री.सत्तार यांनी यावेळी काढली.
शिर्डी एमआयडीसीत एक हजार कोटींची गुंतवणूक – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आगामी काळात शिर्डी एमआयडीसीत १ हजार कोटींची गुंतवणूक होऊन २ हजार तरूणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. शिर्डी व परिसरातील शेतकऱ्यांचा हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. गोदावरी कालव्यातून तालुक्यातील सर्व पाझर तलाव , कालवे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोदावरी कालव्यांच्या नुतनीकरणासाठी शंभर कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. येत्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीत निर्यात सुविधा केंद्रामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ५४० कोटींचे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राहाता तालुक्यात २ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. अतिशय पारदर्शक कारभार राहाता मार्केट कमिटींने केला आहे. देशभरातील शेतमालाचे भाव राहाता बाजार समितीत पाहता येतात. असे ही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अहमदनगर जिल्ह्यात ७ लाख व राहाता तालुक्यात ५४ हजार महिलांना लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांना शंभर टक्के वीज बील माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
राहाता बाजार समितीला २५ एकर जमीन हस्तांतरीत –
यावेळी महसूलमंत्री व पणनमंत्र्यांच्या हस्ते शेती महामंडळाची २४ एकर जमीन (९ हेक्टर ८२ आर) राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीला हस्तांतरित करण्यात आली. जमीन हस्तांतरणाचा सातबारा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
बाजार समिती अवारातील संरक्षण भिंत, अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ते, वॉटर ड्रेनेज लाईन, ऑक्शन प्लॅटफार्मचे काँक्रिटीकरण, कांदाशेड अशा १० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.बाजार समितीचे ज्ञानदेव चौधरी यांनी प्रास्ताविक केले. आभार संतोष गोर्डे पाटील यांनी मानले.