के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘राष्ट्रीय ग्रंथालय दिवस’ साजरा
के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘राष्ट्रीय ग्रंथालय दिवस’ साजरा
के. जे. सोमैया महाविद्यालयात ‘राष्ट्रीय ग्रंथालय दिवस’ साजरा
कोपरगाव विजय कापसे दि १३ ऑगस्ट २०२४– कोपरगाव येथील कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्रंथालय दिवसाचे औचित्य साधुन ग्रंथ प्रदर्शन व स्पर्धा परिक्षा विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन पंकज माळी (संचालक, आत्मा मलिक करिअर अकॅडमी कोकमठाण) महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले, ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. निता शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ग्रंथालय विभागाच्या वतीने पंकज माळी यांचे ‘स्पर्धा परिक्षा : ग्रंथालयाची भूमिका व महत्व’ या विषयावर मार्गदर्शन संपन्न झाले. यावेळी श्री.पंकज माळी यांनी सांगितले कि ग्रंथालयाचा मूळ उद्देश ज्ञान व माहिती संग्रहण हा असतो. आधुनिक काळात ग्रंथालयांची संकल्पना बदलून ते माहितीचे देवाण-घेवाण करणारी संस्था अशी झाली आहे.
स्पर्धा परीक्षा ही खूप व्यापक आणि मोठी संकल्पना असून विद्यार्थ्यांनी परिश्रम, जिद्द, चिकाटी उराशी बाळगून यश प्राप्ती करावी. यावेळी त्यांनी स्पर्धा परिक्षेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध परिक्षेचे स्वरूप व महत्त्व नमूद केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत करतानांच ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. स्पर्धा परीक्षेचे महागडे क्लास लावण्याइतपत परिस्थिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयातील ग्रंथालय हे दीपस्तंभ ठरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. निता शिंदे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत ग्रंथाचे महत्व विषद करतांना आपण जितके जास्त पुस्तके वाचतो तितके आपले ज्ञान वाढत जाते. वाढत्या ज्ञानामुळे जीवनात चांगले निर्णय घेण्यास आपण सक्षम बनत असतो. त्यामुळे चांगली पुस्तके ही आपली मित्र व मार्गदर्शक मानली जातात असे सांगितले. यावेळी त्यांनी ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या असंख्य पुस्तकांची माहितीही दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रविंद्र जाधव यांनी तर मान्यवरांचे आभार प्रा. वर्षा आहेर यांनी मानले. याप्रसंगी डॉ. जे. एस. मोरे, डॉ.एस.बी.भिंगारदिवे, डॉ. वसुदेव साळुंके, विकास सोनवणे, गणेश पाचोरे, स्वप्निल आंबरे, रवि रोहमारे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी ग्रंथालय विभागाच्या वतीने भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांचे अनेकानेक पुस्तके, मासिके व संदर्भ ग्रंथाचा समावेश करण्यात आला होता. याव्यतिरिक्त कथा-कादंबरी, आत्मचरित्र यांच्यासह स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रदर्शनाला अतिथी अभ्यागत, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.