राज्यात चांगला पाऊस होऊन शेतकरी सुखी होऊ दे – आमदार थोरात
तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त खांडेश्वर चरणी प्रार्थना
संगमनेर प्रतिनिधी दि १९ ऑगस्ट २०२४– खांडेश्वर देवस्थान हे तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून वृक्षराईमुळे हा परिसर अत्यंत सुंदर झाला आहे. यावर्षी काही ठिकाणी चांगला पाऊस असून उर्वरित महाराष्ट्राला पावसाची गरज आहे . ईश्वर कृपेने राजभर सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक सुखी समाधानी व आनंदी होऊ दे अशी प्रार्थना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
खांडगाव येथे श्रावण मासानिमित्त तिसऱ्या सोमवारी खांडेश्वर मंदिरात काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी मा.आमदार डॉ सुधीर तांबे,देवस्थानचे अध्यक्ष लहानुभाऊ पा.गुंजाळ, सुरेश थोरात, रमेश गुंजाळ, ॲड.मधुकर गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, सौ.छायाताई गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ, आदींसह खांडेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की, खांडगाव हे तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असून खांडेश्वरला पिढ्याने पिढ्या लोक दर्शनासाठी येत आहेत.तीर्थक्षेत्र विकसित करण्यासाठी आपण सातत्याने निधी दिला असून त्या माध्यमातून हा परिसर सुंदर झाला आहे. दंडकारण्य अभियानातून या परिसरात चांगली वनराई झाली आहे .त्यामुळे सुंदर निसर्ग संपन्न वातावरणासह हा परिसर शांतता आणि स्वच्छतेमुळे भाविकांचे आकर्षण ठरला आहे. खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्य हे इतरांसाठी आदर्शवत आहे.
यावर्षी काही भागात पाऊस झाला. मात्र आपल्या सर्वांना पावसाची मोठी प्रतीक्षा आहे. अजून पावसाचे दिवस बाकी असल्याने ईश्वरचरणी प्रार्थना आहे की सर्व राज्यात चांगला पाऊस पडून राज्यातील सर्व जनता समाधानी सुखी हो आनंदी होऊ दे. अशी प्रार्थना त्यांनी केली.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आपला तालुका आहे. मात्र पर्जन्य छाया मुळे अत्यंत कमी पाऊस पडतो .तरीही आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावागावात व वाडीवस्तीवर सातत्याने अनेक विकासाच्या योजना राबवून आपला तालुका विकासाचे मॉडेल बनवला आहे. हेच एक परिवाराचे वातावरण आपल्या सर्वांना कायम ठेवायचे असून ईश्वराचा आपल्या सर्वांना आशीर्वाद असल्याची ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गुंजाळ यांनी केले तर मधुकर गुंजाळ यांनी आभार मानले यावेळी खांडगाव व परिसरातील कार्यकर्ते महिला नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.