संजीवनी विद्यापीठात कायदे विषयक जागृकता शिबीर संपन्न
संजीवनी विद्यापीठात कायदे विषयक जागृकता शिबीर संपन्न
रॅगिंग ही एक विकृती-न्यायमुर्ती डी. डी. अलमले
कोपरगांव विजय कापसे दि २७ ऑगस्ट २०२४: विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत रॅगिंग पासुन दुर रहावे, कारण रॅगिंग ही एक विकृती आहे. रॅगिंगमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्य धोक्यात येवु शकते. विद्याार्थी दशेत गुन्ह्याची नोंद झाल्यास विद्वत्ता असुनही सरकारी नोकरीपासुन वंचित राहण्याची वेळ येते. म्हणुन विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी कायद्यांची अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधिश -१ तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, कोपरगांव श्री डी. डी. अलमले यांनी केले.
संजीवनी विद्यापीठ व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संजीवनी विद्यापीठात बी.टेक. व एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी कायदे विषयक जागृकता शिबीराचे आयोजनकरण्यात आले होते. सदर प्रसंगी न्यायमुर्ती श्री अलमले प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते. यावेळी दिवाणी न्यायाधिश भगवान पंडीत, कोपरगांव वकिल संघाचे अध्यक्ष ए. एल. वहाडणे, सहायक सरकारी अभियोक्ता ए. डी. टुपके, संजीवनीचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विद्यापीठाच्या प्रो व्हाईस चांसलर डॉ. जे. जानेट, स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीच्या डीन डॉ. कविथा राणी उपस्थित होते.
प्रारंभी अमित कोल्हे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून संजीवनीमध्ये मुलांच्या व मुलींच्या संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. सदर प्रसंगी न्यायमुर्ती श्री अलमले यांनी त्यांच्या समोर आलेली काही प्रकरणे सांगीतली. काही वेळेला विद्यार्थी विनाकारण काही बाबतीत अडकले जातात व त्याचा वाईट परीणाम भविष्यात होतो. म्हणुन विद्यार्थी दशेतच नव्हे तर संपर्ण आयुष्यात कायद्यांचे पालन करावे, असे श्री अलमले शेवटी म्हणाले.