आ. आशुतोष काळेंच्या ‘वचनपूर्तीच्या दहीहंडी’ सोहळ्याला कोपरगावकरांची तुफान गर्दी
आ. आशुतोष काळेंच्या ‘वचनपूर्तीच्या दहीहंडी’ सोहळ्याला कोपरगावकरांची तुफान गर्दी
गौतमी पाटीलच्या नृत्य कलाविष्कार पाहण्यासाठी महिलांची विक्रमी उपस्थिती
कोपरगाव विजय कापसे दि ३० ऑगस्ट २०२४ :- मतदार संघातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून मतदार संघाच्या विकासासाठी ऐतिहासिक कामगिरी करतांना तब्बल तीन हजार कोटीचा निधी आ. आशुतोष काळे यांनी आणला आहे. त्याच धर्तीवर यावर्षीचा दहीहंडी सोहळा ‘वचनपूर्तीची दहीहंडी’ हि थीम घेवून साजरा करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पार पडलेल्या या दहीहंडी सोहळ्याला कोपरगावकरांनी केलेल्या तुफान गर्दीने आ.आशुतोष काळेंना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार करण्याचे एकप्रकारे वचनच दिले.
आपला देश संस्कृती प्रधान देश असून आपल्या मातीला देखील संस्कृतीचा सुगंध आहे. या संस्कृतीतून आपण अनेक सण उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरे करतो. यामध्ये दहीहंडी उत्सव देखील अतिशय महत्वाचा असून या दहीहंडी उत्सवाची परंपरा आजही जपली जात आहे. कोपरगाव शहरात देखील गुरुवार (दि.२९) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ.आशुतोष काळेंच्या ‘वचनपूर्तीच्या दहीहंडी’ला राज्यभरातील गोविंदा पथकाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी गोविदांचा उत्साह वाढविण्यासाठी मुंबई, पुणे शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोपरगावकरांच्या आग्रहास्तव आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ‘वचनपूर्तीच्या दहीहंडी’सोहळ्याला कोपरगावकरांनी तुफान गर्दी करून आजवरचे गर्दीचे सर्वच विक्रम मोडले असून गौतमी पाटील यांच्या नृत्य कलाविष्कार पाहण्यासाठी महिलांनी देखील मोठी गर्दी केल्यामुळे कार्यक्रमस्थळी पाय ठेवायला देखील जागा नव्हती. दहीहंडी सोहळ्यात बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर “मित्रा स्वत:च्या बहिणीसाठी वाघ असशील, मात्र दुसऱ्याच्या बहिणीसाठी पिसाळलेला कुत्रा होवू नकोस” अशा आशयाचे फलक गोविदांनी हातात घेवून भविष्यात बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती होवू नये यासाठी जनजागृती केली.
यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, २०१९ ला मला आशीर्वाद देवून मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी सेवा करण्याची संधी दिली. या संधीचे सोने करतांना दिलेल्या वचनांची पूर्तता या पाच वर्षात केली आहे. मतदार संघातील जनतेचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि यापुढे देखील करणार आहे.त्यामुळे जो आशीर्वाद २०१९ ला दिला तोच आशीर्वाद मतदार संघाच्या विकासाचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी पुन्हा द्या अशी साद उपस्थित जनसमुदायाच्या सागराला घातली. आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करीत आहे यास कला क्षेत्र देखील अपवाद नाही. गोविदांचा उत्साह वाढविण्यासाठी कला क्षेत्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या लाडकी बहिण गौतमीताई पाटील यांचा कोपरगावकरांच्या आग्रहास्तव कार्यक्रम ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले.
या दहीहंडी सोहळ्यात संग्राम पथकाने सात थर, त्याचप्रमाणे इगतपुरीच्या गोविंदा पथकाने सहा थर,शिर्डीच्या स्वराज्य सेना गोविंदा पथकाने सहा थर, घोटीच्या गोविंदा पथकाने पाच थर लावले मात्र एकाही पथकाला दहीहंडी फोडण्यात यश आले नाही. यावेळी दहीहंडीची उंची कमी करून गोविंदा पथकांच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी हि ‘वचनपूर्तीची दहीहंडी’ फोडली व गोविंदा पथकांना बक्षिसाची रक्कम समसमान वाटून देण्यात आली. यावेळी गौतमी पाटील यांच्या नृत्य कलेवर तरुणाईसह ज्येष्ठांनी देखील ठेका धरला होता. गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंग बली की जय अशा गाण्यांच्या सुरांनी परीसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमस्थळी गर्दींचा उच्चांक झाल्यामुळे कोपरगावकरांनी इमारतीच्या गच्चीवरून तर काही युवकांनी झाडावर चढून मिळेल त्या ठिकाणाहून या ‘वचनपूर्तीच्या दहीहंडी’ सोहळ्याच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात साजऱ्या होणाऱ्या दही हंडी उत्सवाप्रमाणेच कोपरगाव शहरात आ.आशुतोष काळेंच्या ‘वचनपूर्तीची दहीहंडी’ सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, गोविंदा पथकाचे सदस्य, नागरिक व महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आशुतोषदादांना महिलांबाबत आदर
आ. आशुतोष काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना गौतमी पाटील यांचा उल्लेख माझी लाडकी बहिण असा केला. त्याचा धागा पकडत गौतमी पाटील यांनी सांगितले की, आम्ही राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम केले पण कोपरगाव सारखी सुविधा आजवर कुठेही मिळाली नाही.यावरून आशुतोषदादांना कलाकार व महिलांप्रती असलेला आदर दिसून येतो. ज्याप्रमाणे राज्यातील जनतेचे आमच्यावर प्रेम आहे त्याप्रमाणे कोपरगावच्या जनतेचे देखील आशुतोषदादांवर प्रेम राहील. –गौतमी पाटील