काळ कसोटीचा असेल पण आमचा वारसा संघर्षाचा आहे – विवेकभैय्या कोल्हे
सहकार महर्षी कोल्हे कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि २८ सप्टेंबर २०२४– सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने प्रत्येक स्पर्धेला सामोरे जात सातत्यांने आधुनिकीकरणांच्या सहाय्यांने काळाची पावले ओळखत विविध उपपदार्थाची निर्मीती करत सीबीजी-सीएनजी प्रकल्प हाती घेतला असुन तो येत्या दोन महिन्यांत कार्यान्वीत होईल. अडचणींत असलेल्या साखर उद्योगाला वाचविण्यांसाठी केंद्राने निर्णय घेतले,तसेच केंद्राने ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपीत वाढ केली तशी एमएसपी मध्येही वाढ करावी म्हणजे साखर कारखान्यांची आर्थीक घडी विस्कटणार नाही. उद्योगासाठी लागणा-या पाण्यांच्या दरात प्रचंड वाढ केल्यांने साखर धंद्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे तेंव्हा हे पाण्यांचे दर कमी करावेत अशी मागणी अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केली.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची ६२ वी वार्षीक सर्वसाधारण सभा शनिवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडली त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
प्रारंभी इफको नविदिल्ली संस्थेवर विवेकभैय्या कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सभासद शेतक-यांच्या वतींने संचालक मंडळाने सत्कार केला.
अहवाल सालात जादा उस उत्पादन घेतलेल्या रामदास बोठे करंजी (आडसाली एकरी ८५.४१६), ताराबाई पोपटराव जुंधारे कोळपेवाडी (पुर्व हंगामी ८१.४५४), अमित सुरेश लोणारी संवत्सर (सुरू एकरी ६२.५१३), रामदास काटवणे घोयेगांव (खोडवा एकरी ८३.८२९) या शेतक-यांसह अन्य मान्यवरांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला.
उपाध्यक्ष मनेष गाडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
श्री. विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दुरदर्शी नेतृत्वाखाली व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने आर्थीक परिस्थितीवर मात करत प्रतिदिनी १२ मे. टन. क्षमतेचा सी.बी.जी प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले असुन ते प्रगतीपथावर आहे. सी.बी.जी व सी.एन.जी. यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सारखेच आहे त्यामुळे तयार झालेले सी.बी.जी. विपणन कंपन्यांना विक्री करू शकतो, सी.बी.जी. तयार करत असतांना त्यातुन आपणांस उच्च प्रतिचे द्रवरूप व सेंद्रिय खत मिळणार आहे., ते सभासद शेतकऱ्यांना देणार आहे.
देशात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने मागील हंगामात सर्वप्रथम उसाच्या रसापासुन थेट इथेनॉल उत्पादन घेतले पण केंद्र शासनाच्या धरसोडीच्या धोरणामुळे इथेनॉल तसेच पडुन राहिले परिणामी उच्च न्यायालयात धाव घेवुन साखर कारखान्यांच्या आर्थीक फटक्याबाबत सविस्तर बाजु मांडली त्याचा सर्वांनाच फायदा झाला आहे.
मक्यापासून उपपदार्थ निर्मिती करता येणार आहे .त्यासाठी १०० दिवसाला जवळपास तीस हजार टन मका लागणार आहे.तसेच बांबू शेती आणि मत्स्य पालन यावर सखोल मार्गदर्शन केले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना ऊस भावात जिल्हयात कधीही मागे नव्हता व यापुढेही मागे राहणार नाही, सभासद शेतक-यांसह सर्वांची दिवाळी गोड करू असे सांगुन ते म्हणाले की, कारखान्यांने औषध निर्मीती क्षेत्रात शास्त्रज्ञांनी लक्षवेधी कामगिरी करत सर्व चाचण्या यशस्वी केल्या आहे. देशात सध्या मधुमेही रुग्णांची संख्या वाढली आहे त्यासाठी बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शुगरफ्रि साखरेची निर्मीती हाती घेतली आहे. कारखान्यांस सतत ऑडीट वर्ग अ मिळाला आहे, कोईमतूर येथुन विविध ऊसाचे वाण आणुन त्याचा बेणे म्हणून सभासद शेतक-यांना विनामुल्य पुरवठा केला आहे, यंदा पर्जन्यमान चांगले झाल्यांने सर्वांनी कार्यक्षेत्रात उस उत्पादन वाढीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत.
उस तोडणी कामगारांचा तुटवडा मोठया प्रमाणांत जाणवत आहे तेंव्हा सभासद शेतक-यांसह नवउद्योजकांनी उसतोडणी यंत्रे घेण्यासाठी पुढे यावे त्याबाबत आपला कारखाना सहकार्याचे धोरण घेणार आहे. शेतकरी आता अन्नदाता राहिला नाही तर ऊर्जादाता झाला आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी असंख्य सहकारी संस्था उभ्या केल्या मात्र मुक्त अर्थव्यवस्थेमुळे त्या अडचणींत आल्या आहेत तेंव्हा त्या संस्थांची आर्थीक सुधारणा करण्यांसाठी आपण सध्या पुढाकार घेत आहोत. शेतीला दुग्धव्यवसायाबरोबरच मत्स्यपालनाची साथ देण्यांसाठी आवश्यक ती पावले आपण उचलली आहेत, सहा महिन्यांत कार्यक्षेत्रातील सभासद शेतक-यांना शास्त्रोक्त पध्दतीने मत्स्यपालनाचे प्रशिक्षण देवुन त्यासाठी बीज देखील उपलब्ध करून दिले आहे, बांबु लागवडीस शासनाचे असणारे अनुदान आपल्याकडील शेतक-यांना मिळावे म्हणून पुढाकार घेतला तेंव्हा शेतक-यांनी बांबु लागवडीकडेही वळावे.
पस्तीस वर्षे काय केले हे विचारणाऱ्यांचे वय देखील तेवढे नाही.समन्यायी पाणी वाटप कायदा २००५ साली आला तेव्हा विरोधक मुक गिळून गप्प राहिले.रोजगार क्षेत्रात शून्य काम आमदारांनी केले.संधीसाधू असणारे विरोधक किती खोटे बोलता याचे पुरावे जनता देईल.आमच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करणार असे तुमचे गुन्हेगारी कनेक्शन समोर आल्यावर बोलणे हे हास्यास्पद आहे.
तीन हजार कोटींचे फलक आले पण निधी कुठं आहे उपस्थितांनी तीस कोटी प्रत्येक गावात आले नाही हात उंचावून काळे यांची पोलखोल केली.आमचा काळ कसोटीचा असेल तरी वारसा संघर्षाचा आहे.आमच्यावर टीका करणार असतील तर त्यांनी आंबेडकर चौक येथे यावे यांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याची हिम्मत दाखवावी असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे.
सद्या दारणा धरणांसह अन्य धरणांवर बिगर सिंचन पाण्यांचे आरक्षण दिवसेंदिवस वाढत आहे, शेतीसाठी नव्यांने पाणी उपलब्धतेसाठी माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आळंदी, कडवा, काश्यपी, गौतमी, मुकणे, पालखेड, मुकणे उंचीवाढ, वालदेवी, भाम, भावली, वाकी आदि धरणांची निर्मिती करून त्यातुन पाणी वाढविले, तुटीच्या खो-यात पश्चिमेचे पाणी पुर्वेकडे वळविण्यांसाठी काम केले ते काम पूर्ण झाल्यास पाणी प्रश्न मिटेल.जायकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे तेंव्हा येथील शेतक-यांना ओव्हरफलोचे पाणी मिळावे, पालखेडचे पाणी पुर्व भागातील शेतक-यांना मिळावे म्हणून सातत्यांने प्रयत्न केले.त्यासाठी संघर्ष करावा लागतो हे दुर्दैव आहे. आपले पाणी कमी झाले म्हणून कोरोनासारख्या आपत्तीत वॉटरलेस इंडस्ट्री आणुन त्यातुन रोजगार स्वयंरोजगाराला चालना दिली. कॉल सेंटर चालु केले असे सांगुन त्यांनी मागील व चालु गळीत हंगामातील कार्याचा आढावा घेत सभासद शेतक-यांना उसाचे उत्पादन वाढविण्यांसाठी आवाहन केले.
शेवटी उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, संचालक सर्वश्री त्र्यंबकराव सरोदे, माजी सभापती शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, संजय होन, महेंद्रशेठ काले, प्रदिप नवले, साईनाथ रोहमारे, अशोकराव औताडे, राजेंद्र नरोडे, औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, आप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, रमेश घोडेराव, उषाताई औताडे, सोनिया पानगव्हाणे, निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, रिपाईचे दिपक गायकवाड, बाळासाहेब पानगव्हाणे, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आजी माजी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन संचालक विश्वासराव महाले यांनी केले.
वार्षीक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणा-या सभासद शेतक-यांना वाढीव उत्पादन देणा-या ऊसजातींसह इफको नेंनो युरिया, ड्रोन फवारणी, रासायनिक सेंद्रीय खते या बाबत माहिती देणारे स्टॉल लावण्यांत आले होते त्यास असंख्य शेतक-यांनी भेटी देवुन त्याची माहिती घेतली.