माझी वसुंधरा अभियानात अहमदनगरचा डंका; कोपरगाव तालुक्यातील संवत्सरला ७५ लाखाचे बक्षीस
माझी वसुंधरा अभियानात अहमदनगरचा डंका; कोपरगाव तालुक्यातील संवत्सरला ७५ लाखाचे बक्षीस
राज्यस्तरीय ६ पुरस्कार आणि विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी; शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन
अहमदनगर विजय कापसे दि २९ सप्टेंबर २०२४– जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने नाशिक विभागात वसुंधरा अभियान ४.० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत एकूण ४ नगर परिषदांनी व महानगरपालिकेने पुरस्कार मिळविल्याने पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे.
जिल्हाधकारी श्री.सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पाचही घटकात चांगली कामगिरी केली. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा उपयोग, एलईडी दिव्यांचा उपयोग, वृक्षारोपण, वॉटर ऑडिट, जल प्रदूषण कमी करणे, नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग, वायू प्रदूषण मुक्ती, जनजागृती आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले.
नुकताच वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर करण्यात आला. यात अहमदनगर महानगरपालिकेला राज्य स्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला. महानगरपालिकेने सतत दुसऱ्या वर्षी पुरस्कार मिळविला आहे. अशी कामगिरी करणारी अहमदनगर महानगरपालिका राज्यात पहिली महापालिका आहे.
संगमनेर नगरपरिषदेने ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या गटात राज्यस्तर उत्तेजनार्थमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. २५ ते ५० हजार लोकसंख्या गटामध्ये विभागस्तरावर शिर्डी नगर परिषदेने प्रथम तर देवळाली प्रवरा नगर परिषदेने तृतीय क्रमांक आणि राहाता नगर परिषदेने १५ ते २५ हजार लोकसंख्या गटात राज्यस्तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषदेने उत्कृष्ट नियोजन केल्याने जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना १६ पुरस्कार जाहीर झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी , कर्जत तालुक्यातील मिरजगांव, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर, राहाता तालुक्यातील लोणी बु., गुंजाळवाडी, धांदरफळ बु., शेवगाव तालुक्यातील वाघाली, संगमनेर तालुक्यातील खांडगांव, आव्हाणे बु., संगमनेर तालुक्यातील पेमगिरी, चिचोली गुरव, संगमनेर तालुक्यातील लोहारे, तिगांव, श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद, संगमनेर तालुक्यातील चौरकौठे या ग्रामपंचायतींना राज्य आणि विभाग स्तरावर विविध गटात पुरस्कार जाहीर झाले आहेत.पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींनी भुमी,वायू,अग्नी, जल व आकाश या घटकात शासनाच्या मागदर्शक निर्देशानुसार उपययोजना केल्या आहेत.