देर्डे चांदवड श्री मारुती देवस्थानास ‘क’वर्ग दर्जा मंजूर- आ.आशुतोष काळे

देर्डे चांदवड श्री मारुती देवस्थानास ‘क’वर्ग दर्जा मंजूर- आ.आशुतोष काळे
देर्डे चांदवड श्री मारुती देवस्थानास ‘क’वर्ग दर्जा मंजूर- आ.आशुतोष काळे

कोपरगाव विजय कापसे दि २५ जानेवारी २०२६ :-जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या मागणीनुसार देर्डे चांदवड येथील मारुती देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली असून कोपरगाव रुग्णालयासाठी अतिरिक्त रुग्णवाहिका मिळावी या प्रमुख मागण्यांसह जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे त्यांनी मतदार संघाच्या विविध मागण्या मांडल्या आहेत.

जिल्हा नियोजन समितीची बैठक रविवार (दि.२५) रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती ना.रामजी शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघाच्या विविध अडचणी व समस्या मांडल्या. यामध्ये कोपरगाव मतदार संघातील देर्डे चांदवड येथील श्री मारुती देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा हि मागणी मंजूर करण्यात आली आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून सर्व रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी अतिरिक्त रुग्णवाहिका मिळावी. तसेच तसेच संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होवून त्या ठिकाणी ३० बेडच्या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात येवून ते कामही प्रगतीपथावर असून संवत्सर प्रमाणे कोकमठाण गावची लोकसंख्या देखील १० ते ११ हजाराच्या आसपास असून त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे. त्यामुळे संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कोकमठाण येथे स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे दाखल केलेला असून सदरचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा.

शासकीय जमिनीची शासकीय प्रयोजनासाठी मोजणी अधिकारी यांनी विनामूल्य मोजणी करून देणेकरीता तहसीलदार, कोपरगांव यांनी वेळोवेळी मागणी उपअधिक्षक, भूमी अभिलेख यांचेकडे केलेली असून त्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्याकरिता मा.जिल्हाधिकारी यांनी कोपरगाव मतदार संघातील शासकीय जमिनी शासकीय प्रयोजनासाठी विनामूल्य मोजणी करण्यासाठी संबंधितांना तातडीने आदेश द्यावेत. तसेच नांदेड जिल्हा परिषदेने ज्याप्रमाणे विज बिल मुक्त ग्रामपंचायत अभियान राबविले आहे त्याप्रमाणे सदरची योजना अहिल्यानगर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात यावी. ग्रामपंचायतीचा वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा व अंगणवाडी आदी संस्थांना सोलरद्वारे विजपुरवठा करावा. जेणेकरून पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे.त्यासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत व अंगणवाडी इमारतींवर किमान १ के.व्ही. चे सौर संयत्र व जिल्हा परिषद शाळेसाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी साठी १ के. व्ही. व इयत्ता १ ली ते ७ वी साठी किमान २ के. व्ही.चे सौर संयत्र बसविणे गरजेचे असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत सांगितले. या सर्व मागण्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी सकारात्मक प्रतिसाद असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,आ.मोनिकाताई राजळे,आ.डॉ.किरण लहामटे, आ.विठ्ठलराव लंघे, आ.विक्रम पाचपुते, आ.अमोल खताळ, आ.काशिनाथ दाते, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी आदी उपस्थित होते.
मंत्री, आमदार, खासदार कोणाचे नाव सांगितले तरी सोडू नका
कोपरगाव मतदार संघात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाबरोबरच अवैधरीत्या सुरु असलेला बेसुमार वाळू उपसा व तसेच शेतकऱ्यांच्या व वन विभागाच्या जमिनीतून मातीच्या उपशाबाबत आक्रमक झालेल्या आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करून पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे लक्ष वेधले.त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कारवाई करणार असल्याचे सांगितले असता पालकमंत्र्यांनी त्यांना सक्त आदेश दिले आहेत. अवैध व्यवसाय करणारा मंत्री, आमदार, खासदार कोणाचे नाव सांगितले तरी सोडू नका, कडक कारवाई करा अशा सूचना पोलीस प्रशासनाला पालकमंत्र्यांनी दिल्या.



