माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
संगमनेर विजय कापसे दि १६ जानेवारी २०२५- अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तीरावरील जोर्वे हे माझे माहेर. पंचक्रोशीत थोरात परिवाराला समाजात मोठी प्रतिष्ठा, गावची पाटिलकी ही पंजोबंपासूनच थोरात परिवाराकडे. आजोबा संतूजी पाटील हे इंग्रजी मॅट्रिक झालेले. पुरोगामी विचाराचे जात-पात न पाळणारे, वाचनाची आवड असणारे होते. माझे वडील भाऊसाहेब थोरात व आई सौ. मथुराबाई यांची मी सर्वात धाकटी मुलगी, उंचीने कमी व नाजूक असल्याने कुटुंबात सर्वांचीच लाडकी होते. घरात राजकारणात , समाजकारणात असल्याने पाहुण्यांची कार्यकर्त्यांची वर्दळ खुप असायची. गाव संगमनेर पासून लांब असल्याने दादांना भेटणारे पाहुणे, कार्यकर्ते मुक्कामीच येत. पण माझी आई सर्वांना जेवण देणे , मुक्कामाची सोय करणे हे स्वत: करायची. कुटुंबाच्या या संस्कारातूनच आम्ही भावंडे घडलो.
माझे शिक्षण पूर्ण झाले. थोरात परिवाराचे स्नेही श्री प्रतापराव बोर्डे व माझे आतेभाऊ अनिल अण्णासाहेब शिंदे यांनी डॉ.सुधीर तांबे यांचे स्थळ सुचवले. अनिलभाऊंची भेट श्रीरामपूरच्या सेंट लूक (जर्मन) हॉस्पिटल मध्ये झाली होती त्यांनी सांगितले की डॉ.सुधीर तांबे हे कष्टाळू व स्वभावाने चांगले आहे. दुर्गासाठी बघावे त्यातूनच पसंती होऊन 10 फेब्रुवारी 1981 रोजी मी व डॉ. तांबे विवाहबद्ध झालो.
डॉ. सुधीर तांबे यांचा जन्म 17 जानेवारी 1955 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीच्या तिरावरील ‘‘ दाढ ’’ या गावी झाला. मामाचे गाव दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्या गोदावरी नदीच्या तीरावर एक धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक खुणा असणारे, अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा हे गाव. पुणतांब्याच्या आप्पासाहेब धनवटे स्वातंत्र्य चळवळीत व नंतर कम्युनिस्ट म्हणून समाजात काम करत होते त्यांच्यात कम्युनिझम होता. पुणतांब्याच्या धनवटे परिवाराला नागपूरच्या धनवटे या राजघराण्याचा वारसा आहे. हा राजघराण्याचा परिवार पुणतांब्याला आल्यानंतर येथेही राय केले आजही पुणतांब्यात, वाडे, वेशी यांच्या खुणा आहेत. मामाच्या वाड्यात अनेक क्रांतीची पुस्तके, चरित्र अशी पुस्तके होती. मामांना वाचण्याची आवड होती, मामाच्या गावाला गेल्यानंतर वाचनाचा छंद डॉ. तांबे यांना लागला व त्यातून वैचारिक समृध्दी वाढली. डॉ.तांबे यांच्या आई लहानपणी स्वातंत्र्याच्या लढ्यात पहाटे प्रभात फेरीला जायच्या त्या वेळच्या स्फूर्तीगीते त्या अजूनही म्हणायच्या डॉ.चे वडील भास्करराव तांबे हे सातवी पास झाले तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी जनतेला आव्हान केले की विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मोफत यावे. अण्णांनी व्हॅालेंटीअर शिक्षक म्हणून काम केले. व्हॉलेंटीअर म्हणजे खेडेगावात जाऊन सेवाभावी वृत्तीने विनावेतन मुलांना शिक्षण द्यावे. गावकरी देतील ते घ्यावे, गावातच राहावे. अण्णांना शिक्षक म्हणून दाढ, झरेकाठी, चिंचपूर, खळी येथे काम केले. पंचक्रोषीत ते मास्तर म्हणून ते प्रसिद्ध होते. पुढे ते ग्रामसेवक झाले व नोकरी केली. शेवटपर्यंत लोक त्यांना भिका ‘‘ मास्तर ’’ म्हणूनच ओळखत होते असा काहीतरी वेगळा वारसा त्यांना मिळाला. आमच्या लग्नानंतर माझे वडील थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व भाऊ नामदार बाळासाहेब थोरात यांचा डॉ.तांबेंना सहवास मिळाला. समाजकार्यात असणार्या मित्रांचा सहवास डॉ. ना मिळाला व डॉ. तांबे यांचे जीवन अधिकच समृद्ध झाले.
डॉ. यांचे बालपण कोपरगाव, राहाता ,कोल्हार ,दाड, पुणतांबा या ठिकाणी गेले. ते उपजतच बुद्धिमान होते. आई वेळेच्या बाबतीत काटेकोर होत्या, वडील शिस्तप्रिय होते. त्यांना शिस्त मोडली चालत नसे ते स्वत: अतिशय प्रामणिक होते. त्यांना खोटे बोलणे व लबाडी चालत नव्हती. मग असे घडल्यास समोरच्याच्या समाचार घेत तशी सवय डॉ. सुधीर तांबे यांनाही लागल्या. आजही डॉक्टर वेळेच्या बाबतीत काटेकोर असतात खोटे बोलणे व लबाडी दिसल्यास समोरच्याची काही खरे नसते. त्यांना उगीचच वेळ वाया घालवायला आवडत नाही. पारदर्शकता हा त्यांच्या स्वभावातील गुण आहे. त्यांना वरवर खोटे बोललेले आवडत नाही जे आहे ते स्पष्टपणे बोलतात. 1965 रोजी ते कोल्हारच्या शाळेत होते. भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी तेव्हाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जनतेला आव्हान केले की भारताला युद्धासाठी विमान घ्यायचे आहे त्यासाठी 25 लाख रुपये पाहिजे. ही बातमी या तिसरीतील डॉ. ना कळली. त्यांनी सवंगडी गोळा केले व एक पुस्तक पुठ्ठ्यााचा बॉक्स केला त्यावर युद्धासाठी मदत चिठ्ठी लावून कोल्हारच्या बाजारात 27 रुपये व काही पैसे गोळा केली. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे हे पहिले समाजकार्य.
डॉक्टरांच्या वडिलांनी शेती करतांना मुलांच्या शिक्षणावर अधिक भर दिला. अण्णांची आर्थिक साक्षरता उत्तम होती. काटकसर , व्यवहाराला चोख होते. अण्णांनी मुलांना, मुलींना पुढील शिक्षणासाठी पुण्यात ठेवले. डॉक्टर तांबे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये चांगले मार्क्स मिळून स्कॉलरशिपवर पुण्याच्या बीजे मेडिकल ( ससून हॉस्पिटल ) येथे प्रवेश मिळविला. बीजे मेडिकल मध्ये अभ्यासाबरोबरच समविचारी मित्रांचा गट तयार करून कॉलेजमधील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. त्यांनी जर्मन भाषेचाही अभ्यास केला. त्यांना मिळत असलेल्या स्कॉलरशिप मधून मेस बिल व किरकोळ खर्च काढून बाकी पैसे ते वडिलांना मनीऑर्डर करत तेव्हा महिन्याच्या जेवण व इतर खर्च 100 रुपये येत असे. तसेच ससून हॉस्पिटल महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याने विविध ग्रामीण भागातून गरीब रुग्ण येथे येत असत.त्यांना डॉक्टर खूप सहकार्य करायचे, मदत करण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना तिथेही स्वस्थ बसू देत नव्हता. स्वत: अतिशय कष्टाळू वृत्ती असल्याने बीजे मेडिकल मध्ये त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही जेवढे शिकता येईल तेवढे शिकत होते. इमर्जन्सी वार्डात ते रात्रंदिवस काम करायचे. पुढे त्यांना सर्जरी ( एम एस ) साठी स्कॉलरशिपवरच अॅडमिशन मिळाली. त्यांचे गुरु डॉ.साने सर होते ते त्यांना सर्जरी शिकवत. डॉक्टरांचा हात खूप मऊ आहे, सर्जनसाठी असाच हात पाहिजे. डॉ. आता सर्जरी सहज करू लागले. डॉक्टर हे साने सरांचे आवडते विद्यार्थी होते. डॉक्टर तांबे हे मितभाषी आहेत. एखादे काम सोपवले तर ते पूर्ण करतात मग त्यांना कितीही त्रास होवो. त्यांनी शिकतांना कधीच आळस, कंटाळा, दुर्लक्ष केले नाही. ते एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे.
एम.एस च्या दुसर्या वर्षाला असताना आमचा विवाह झाला. एम एस जनरल सर्जन झाल्यानंतर सर्वानुमते त्यांनी संगमनेरला प्रॅक्टिस करण्याचे ठरवले. सर्जन म्हणून त्यांनी छोट्या जागेत प्रॅक्टिस सुरू केली. लोक म्हणायचे या जागेत व्यवसाय चालत नाही. डॉक्टर अंधश्रद्धाळू अजिबात नाही ते म्हणाले मग मी येथेच हॉस्पिटल काढणार खरंच ती जागा भाड्याने घेतली व तेथे खूप प्रॅक्टिस चालली. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे व उत्तम सर्जरीमुळे हॉस्पिटल ला खूप गर्दी होऊ लागली. ऑपरेशन साठी पुणे ,नाशिक ,नगर ,मुंबईला जाणारे रुग्ण येथे ऑपरेशन करू लागले. डॉक्टर तांबे हॉस्पिटल पंचक्रोशीत प्रसिद्ध झाले. नवीन 35 बेडचे हॉस्पिटल बांधले. शेजारच्या अनेक तालुक्यातून पेशंट येऊ लागले. हॉस्पिटल ची मोठी जबाबदारी असूनही त्यांची समाजसेवेची आवड स्वस्थ बसू देईना. समविचारी मित्र मिळत गेली. त्यांनी संग्राम नावाची संस्था काढली संग्राम ची नाट्यसंस्था काढली. त्यातूनच डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. अरविंद रसाळ, डॉ. देवेंद्र ओहरा, डॉ. सूर्यकांत शिंदे , डॉ. शिंदे इत्यादी अनेक मित्रांचा गोतावळा तयार झाला. डॉ. मुटकुळे यांनी महात्मा फुले यांचेवर नाटक लिहिले व शिंदे सरांनी भूमिका केली. समाजसुधारकांचे कार्य समाजापुढे येण्यासाठी खूप नाट्यप्रयोग झाले रायपातळीवर बक्षीसे मिळाली. संग्राम करिअर अकॅडमी , संग्राम गुणवत्ता विकास असे वेगळे प्रकल्प राबवले. तालुक्यात सर्व शाळांमध्ये पहिले आलेले दोन विद्यार्थी 5 वी ते 9 वी तील घेऊन त्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी दर रविवारी त्यांना संगमनेर मध्ये वि-ाान, गणित , इंग्रजी हे विषय शिकवत. त्यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला.
गावोगाव पुस्तकांच्या पेट्या पाठवून त्यांनी फिरते ग्रंथालय चालवले. तालुक्यातील गरजू महिलांना शिलाई मशीन वाटल्या, गरीब शेतकर्यांना गाई , शेळ्या वाटप केले. जेणेकरून त्या परिवाराचा आर्थिक दर्जा उंचविण्यासाठी प्रयत्न केले. शेतकर्यांसाठी व्याख्याने आयोजित केली. नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्याची व्याख्या ठेवली. दुष्काळी गावे दत्तक घेऊन पाणी आडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबवली. संग्राम संस्थेने अपंगांसाठी मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालय काढले. संग्राम नागरी पतसंस्था काढली. हॉस्पिटलचा व्याप, ऑपरेशन इमर्जन्सी सांभाळून समाज सेवा चालू ठेवली.
तिर्थरुप भाऊसाहेब थोरात ( दादा ) यांची 61 निमित्त नागरिकांनी दिलेल्या देणगी ( गौरव निधीतून ) दादांनी एस.एम.बी.टी सेवाभावी ट्रस्ट स्थापन केले. त्याचे ट्रस्टी म्हणून भाऊ श्री बाळासाहेब थोरात व डॉ. तांबे यांनी त्यातून अमृतवाहिनी हॉस्पिटल सुरू केले पुढे त्याला जोडून डेंटल कॉलेज काढले पुढे आयुर्वेद कॉलेज काढले पुढे वैद्यकीय क्षेत्रात पुढचे पाऊल पडले.
डॉक्टर तांबे यांची समाजाविषयीची तळमळ बघून वसंतराव गाडे व बी.जी.देशमुख आणि इतर मित्रांनी त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे राहा तुमच्यासारखा सर्जन नगराध्यक्ष पाहिजे अशा आग्रहामुळे ते राजकारणात आले. त्यांचा स्वभाव शिस्तप्रिय प्रामाणिक असल्याने त्यांना नगराध्यक्ष होताच नगराध्यक्षांना असलेल्या गाडीचा लिलाव केला. सर्जन म्हणून नगरपरिषदेच्या चुकीच्या पद्धतीची सर्जरी केली. नगराध्यक्षपद, हॉस्पिटल सांभाळताना सर्जरी पहाटेच करत दुपारपर्यंत ओपीडी बघून दुपारच्या पुढे नगर परिषदेचे कामकाज बघत नगराध्यक्ष म्हणून ते लोकप्रिय झाले. तालुक्यात ते भाऊ नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मागे खंबीरपणे उभे होतेच.
त्यांची समाजाविषयीच्या असणार्या तळमळीमधून त्यांनी ‘‘ जयहिंद लोकचळवळ ’’ अंतर्गत जयहिंद युवा मंचची स्थापना केली व माझ्यासाठी जयहिंद महिला मंचची स्थापना केली. जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून निरोगी व निकोप समाज व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले. तालुक्यात तरुणांना ही संकल्पना खूप आवडली. गावोगाव जयहिंद युवा मंच शाखा स्थापन झाल्या. अनेक तरुणांचे त्यातून संघटन झाले. त्यातून क्रीडा स्पर्धा,आरोग्य शिबिरे, विविध गुणदर्शन, वकृत्वस्पर्धा, वाचन, गृह उद्योग मार्गदर्शन, करून शेतकर्यांना मार्गदर्शनासह इत्यादी कार्य आजही चालू आहेत. तरुणांमध्ये समाजकार्याची आवड निर्माण झाली. जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून तालुक्यात 1200 बचत गटांचे जाळे निर्माण झाले. जयहिंद लोकचळवळ अंतर्गत दंडकारण्य अभियान हे पर्यावरण रक्षणाचे कार्य भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली 16 वर्षे चालू आहे. त्यातून 28 कोटी बियांचे बीजारोपण केले. सामाजिक वनीकरण , वनविभाग, सर्व संस्थांच्या सहकार्याने ही 80 लाख रोपे लावली. आता बारा गावे दत्तक घेऊन त्या गावात पाण्याची पातळी वाढवणे, वृक्षारोपण, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, गट शेती इत्यादी कामे चालू आहेत. कोरोनाच्या संकटामुळे महात्मा गांधी जयंती निमित्त दोन वर्षे इंटरनॅशनल व्ह्यर्च्यअल कॉन्फरन्स घेतली.त्यात जगातील अनेक मान्यवर व्यक्ती सहभागी झाल्या.
2006 साली मी ‘‘ नगराध्यक्ष ’’ झाले. आज पर्यंतच्या 15 वर्षाच्या कारकिर्दीत माझ्याभोवती भाऊ ना. बाळासाहेब थोरात व डॉक्टर तांबे माझी मुले सत्यजीत , हर्षल यांचे कवच असल्याने मला कधीच काही भीती वाटली नाही. कारण माझा भरभक्कम ‘‘ कारभारी ’’ माझ्या पाठीशी उभा आहे. त्यांनी माझ्या कामात कधीच ढवळाढवळ केली नाही. त्यांनी नगरपरिषदेत घालून दिलेल्या शिस्तीनेच मी कारभार केला. ते अनेक ठिकाणी माझा सल्ला विचारतात. प्रत्येक गोष्ट मला सांगतात. मला मानाने वागवतात. त्यांची भाषा शुद्ध आहे ते कोणतेही अपशब्द वापरत नाही. एकेरी बोलत नाही, हजरजबाबी आहे. चेष्टा करायची खूप सवय आहे. कपड्यांचा शौक नाही. स्वत:साठी काही काही खरेदी करत नाही गरजा खूप कमी आहे.
2009 मध्ये नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार श्री. प्रतापदादा सोनवणे हे ‘‘ खासदार ’’ झाले. व ती जागा रिक्त झाल्याने नाशिक पदवीधर मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली. 11 महिन्यांसाठी मुदत होती डॉक्टरांना परत मित्रांनी आग्रह केला की ही निवडणूक लढवावी. पण सोपे नव्हते या मतदारसंघात अहमदनगर नाशिक, धुळे ,जळगाव,नंदुरबार हे 5 जिल्हे, 54 तालुके असून पाच हजार गावे आहेत. सोलापूरच्या सीमेपासून तर मध्य प्रदेश, गुजराच्या सीमेपर्यंत एवढ्या लांबीचा हा मतदारसंघ आहे. अशक्य वाटणारी गोष्ट होती पण माझे वडील भाऊसाहेब थोरात यांचा दांडगा जनसंपर्क, माझे भाऊ नामदार बाळासाहेब थोरात यांचे महाराष्ट्रातील नेतृत्व आणि टीडीएफ संघटनेने भक्कम पाठिंबा दिला.यासाठी हिरालाल पगडाल व इतर सर्व शिक्षक नेत्यांनी केलेले प्रयत्न या सर्वांच्यामुळे ही निवडणूक जिंकता आली. कार्यकर्ते, नातेवाईक , संस्था , सर्व मदतीला आले. उत्साहाच्या वातावरणात निवडणुकीची तयारी सुरू झाली. डॉक्टर तांबे 5 जिल्ह्यात प्रथमच भेटत होते परंतु त्यांच्या स्वभावामुळे ते पहिल्या भेटीतच लोकप्रिय होत. तरुण भेटल्यावर गळ्यात हात घालत येष्ठांचा आदर ठेवणे. महिला भगिनींशी बहिणीच्या मायेने बोलने यातूनच जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे नाते तयार झाले. इथून गेलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी तेथे मोठा गोतावळा तयार केला. माणसाने माणूस जोडला गेला आणि गणंगोत तयार झाले. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार झाले.
11 महिन्यात दुसरी निवडणूक लागली तिची तयारी सुरू झाली. अकरा महिन्याच्या काळात त्यांचा जनसंपर्क वाढला. त्यांच्या कामाचा पाठपुरावा पाहिला, प्रत्येकाला भेटण्याच्या त्यांच्या स्वभावावरून ते लोकप्रिय झाले. दुसरी निवडणूक ही जिंकली तिसरी निवडणूक 6 वर्षांनंतर आली. नाशिक पदवीधर मतदारसंघात 48 आमदार , 8 खासदार व मंत्री असतात. केंद्र व रायात भाजपची सत्ता असल्याने बहुतांश आमदार , खासदार मंत्री भाजपचे होते. याही निवडणुकीत त्यांनी मित्रपक्ष व स्वबळावर कर्तबगारीने दैदीप्यमान यश मिळावले. व ते तिसर्यांदा आमदार झाले.
त्यांचा रोजचा दिवस ते मेडिकल प्रॅक्टिस करत होते तेव्हापासून पहाटेच सुरू होतो. तेव्हापासून ते पहाटेच ऑपरेशन करत. आळशीपणा अजिबात करत नाहीत. मी त्यांना चाळीस वर्षात उगीच वेळ घालवीत, झोपलेले पाहिले नाही. व्यायामाची सवय आहे. एवढा उत्साह तरी कसा असतो समजत नाही. पण माझ्या सासूबाई प्रयागबाई पहाटे चार वाजताच उठून पाहिले स्नान करून दोन तास देवपूजा करायच्या त्यांच्या त खूप उत्साह होता व नेहमी आनंदी होत्या. तोच उत्साह डॉक्टर तांबे यांच्यात आहेत. हे आईकडूनच मिळालेले बाळकडू आहे. 5 जिल्हे व 54 तालुके 5 हजार गावे यामुळे रोजचा प्रवास खूप होतो. गाडीमध्ये रात्रीच्या प्रवासात जुने हिंदी गाणे ऐकतात. कितीही थकून आले तरी वाचन करतात.
पहाटे उठल्यावर संत तुकाराम,संत चोखोबा इत्यादी संतांचे अभंग लावून तल्लीन होऊन जातात. ते सकाळी लवकर आवरून आठ वाजता नागरिकांना भेटतात. यांचे काही प्रश्न , समस्या, अडचणी असतील त्या मध्यस्थीला बोलावून लगेच मीटिंग लावून अधिकार्यांना फोन लावून लगेच सोडवतात. बाहेरगावच्या पाच जिल्ह्यांतून आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करतात. पाच जिल्ह्यातील निवडणूक लढवताना त्यांनी खूप मित्र भाऊ – बहीण कार्यकर्ते मिळाले. मोठा गोतावळा तयार झाला. तरुण मुले, मित्र झाले. डॉक्टरांना जिल्ह्याच्या रोजच्या दौर्यात सर्वांनी खूप प्रेम , आदर,माया दिली. खूप आदरतिथ्य केले. राहण्याची सोय जेवण प्रत्येक जिल्ह्याच्या पद्धतीप्रमाणे जळगावचे भरीत,कळण्याची भाकरी,भाजलेली डाळबट्टी,नंदुरबारची उडदाची आमटी,मक्याची भाकरी,मिरचीची भाजी ,कच्ची मेथी,नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा कर्जत,जामखेडची शिपीची आमटी – भाकरी,शेंगदाणे असे खूप प्रकारचे खायला दिले. काही असे मित्र मिळाले की मोठ्या भावासारखे सेवा केली. धुळ्यााचे डॉ. वानखेडकर, पाचपुते अण्णा सर्वजण त्याची इतकी काळजी घेतात की त्यांनी प्रवासात त्यांचा थकवा जाण्यासाठी गरम गरम पाण्याची अंघोळ , गरम गरम जेवायला देतात. नगरचे डॉ. सोनार भेटले की डॉ.तांबे आनंदीच होतात. येष्ठांनीही डॉक्टरांवर खूप प्रेम केले. त्यातील काही माझ्या वडिलांचे मित्र होते धुळयाचे सचिन भाऊ , जळगावचे छोटू भाऊ अशी अनेक नावे आहेत की ते डॉक्टर निरपेक्ष प्रेम करतात. पाच जिल्ह्यात ते रोजच फिरतात. सार्वजनिक कार्यक्रम, सुखदु:खाचे कार्यक्रम,वैयक्तिक कार्यक्रम सर्व ठिकाणी न चुकता जातात. सर्वांच्या आदरातिथ्याने व प्रेमाने त्यांचा थकवा निघून जाता.व सकाळपासून रात्रीपर्यंत ते उत्साहाने कार्यकर्त्यांना भेटत व आनंद घेतच,फिरतात. ते घरी कधी पोहोचणार म्हणून कामानिमित्त रात्रीपर्यंत कार्यकर्ते वाट बघत असतात. एवढ्या प्रवासाने तरी त्यांना उत्साहाने भेटतात. गप्पा मारतात, चहा-कॉफी देतात. मोबाईल वरील फोन घ्यायचे टाळत नाही, समोरचा कितीही कंटाळवाणा असला तरी ते फोन घेऊन चेष्टा करत बोलतात. व्हाट्सअप वापरत नाहीत.
सत्यजित व हर्षल या दोन्ही मुलांना त्यांच्या शिस्तीतच वाढवले आहे. मुले मराठी शाळेत शिकले परंतु त्यांचे इंग्रजीवर चांगले प्रभुत्व आहे. डॉ.तांबे यांच्या वळणदार अक्षरासारखे दोघांचेही अक्षर वळणदार आहेत. त्यांच्याच तालमीत तयार झालेली दोघीही मुले व्यवस्थापनात , स्वभावात व कोणत्या क्षेत्रात कमी नाही. सत्यजित हा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे. दहा वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य होता. सर्व महाराष्ट्रातील युवक नेतृत्वात तो लोकप्रिय आहे. राजकारणाची चांगली जाण त्याला आहे. व दुसरा हर्षल हा वैद्यकीय क्षेत्रात आहे. भाऊ बाळासाहेब थोरात , आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एस एम बी टी हॉस्पिटल च्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र व पालघर-ठाणे या परिसरातील गरीब रुग्णांसाठी दर्जेदार वैद्यकीय सुविधा मोफत अतिशय माफक दरात पुरवण्याचे काम तो करत आहे. लाखो रुग्णांना या सेवा पुरवल्या जात आहेत हर्षल व्यवस्थापनात कुशल आहे. त्यांची सेवाभावी वृत्ती आहे. दोघेही आपापल्या क्षेत्रात लोकप्रिय आहेत
आमच्या लग्नाला आता 40 वर्षे होतील. सासूबाईंना सुद्धा पाहुणे आलेले खूप आवडायचे व त्या सुगरण होत्या. पाहुण्यांना जिलेबी, श्रीखंड, बुंदीचे लाडू ,बासुंदी इत्यादी गोड पदार्थ त्या घरीच बनवायच्या तशीच पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची आवड डॉक्टरांना आहे. त्यांनाही पदार्थाची खूप माहिती आहे. चाळीस वर्षांपूर्वी मिक्सर नव्हते. आमचे नवीनच लग्न झालेले होते. फोन मोबाईल नव्हते मला सांगायचे चार-पाच पाहुणे संध्याकाळी जेवायला आहेत. फार काही त्रास घेवू नको फक्त मसाले भात, मटार रस्सा ,गाजराचा हलवा ,काकडीची कोशिंबीर ,ओल्या नारळाची चटणी तेवढेच कर. खूप अवघड पदार्थ ते सोप्या भाषेत सांगून जणूकाही बनवायला काही त्रास होणार नाही असे सांगत. त्यांना माझ्या हाताने बनवलेली पुरणपोळी , उत्तप्पा चटणी,मटारची करंजी हे पदार्थ आवडतात. ते लवकर प्रशंसा करत नाही कारण ते सर्जन असल्याने त्यांना सर्व परफेक्ट लागते. थोडीही चूक त्यांना चालत नाही. ते कोणाला गिफ्ट देत नाही तो कुणाचेही गिप्ट घेत नाही. पण आता नाती अहिल्या व सारा गिफ्टची वाट बघतात. त्यांच्यासाठी ते आठवणीने गिफ्ट नेतात. सुनबाई डॉ. मैथिली व डॉ. वर्षा यांची ते खूप काळजी घेतात. त्याही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या प्रगतीसाठी त्यांनाही ती योग्य मार्गदर्शन करतात.सुनबाई त्यांची खूप काळजी घेतात व लाड करतात. म्हणतात पप्पा आराम करा ना ! डॉक्टर म्हणतात कामात बदल म्हणजेच आराम, आम्ही जगातील 15 देशात परदेशी दौरे केले आहे. तेथील संस्कृती,शाळा, हॉस्पिटल, कुटुंब व्यवस्था यांचा अभ्यास केला आहे डॉ. तांबे यांना डोंगरदर्यात फिरायला आवडताते. संगमनेर तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत पूर्वी वेळ मिळायचा तेव्हा दर रविवारी डोंगर फिरायचे.
डॉक्टर मला प्रत्येक गोष्टीत आदर देतात. माझी खूप काळजी घेतात. स्वभावाने ते हळवे भावनिक आहेत. एखाद्या भावनिक प्रसंगाने त्यांचे डोळे लगेच भरून येतात. मी त्यांच्या म्हणते तुम्ही एवढे कडक स्वभावाचे आहात मग एवढे भावनिक कसे ? याचे मला कोडे उलगडत नाही. कारण मी अजिबात भावनिक नाही. लग्न होऊन सासरी जाताना सुद्धा मी रडले नाही. याचे आश्चर्य खुद्द नवरदेवाला म्हणजे डॉक्टर तांबे यांना वाटले होते कि नवरी रडत कशी नाही ?
ते स्वत : डॉक्टर असल्याने चुकीच्या आहारामुळे शरीरात कसे दोष निर्माण होतात याचा अभ्यास असल्याने तो स्वयंपाकात पदार्थ कसे करावे ते सांगतात. मीठ, साखर, तेल ,तूप आहारात कमी असावे याविषयी सतत सूचना देतात. त्यांना स्वयंपाकात मदत करायला आवडते. आईला स्वयंपाकाचे जास्त काम पडु नये म्हणुन पाट्यावर स्वत: मसाले वाटून घ्यायचे. ते मातृ-पितृ भक्त आहेत. आई-वडिलांवर त्यांनी खूप प्रेम केले. त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांची सेवाभावी वृत्तीने मायेने सांभाळले.
त्यांना आत्तापर्यंतच्या आयुष्यात सर्वांच्या सहकार्याने स्वत:च्या कर्तुत्वाने, कष्टाने यश मिळवले. अशा बुद्धीमान व्यक्तीबरोबर व 40 वर्षे संसार करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. ती मी पूर्ण करतेय व जीवनाचा आनंद घेत आहे. मला इतका प्रामाणिक बुद्धिमान ,चारित्र्यसंपन्न पती मिळाला यामुळे परमेश्वराचे आभार मानते.
त्यांना मान ,प्रतिष्ठा, पैसा , पद परत सर्व भरभरून मिळाले. व त्यात ते भरभरून आनंद मानतात. त्यांना माणसात राहायला आवडते. वामनदादा कर्डक यांनी रचलेले ‘‘ माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे ’’ हे त्यांचे आवडते गीत व तेच जीवना विषयाचे तत्व-ाान !
असे आमचे पतिराज यांच्यासाठी जुन्या जात्यावर म्हटल्या जाणार्या ‘‘ पती ’’ वरील ओव्या मी लिहिते
समोरच्या सोप्यामंदी, कोण झोपला गोरापान !
चुडा माझा राजस, दुधावरचा पैलवान !! 1 !!
सरलं दळण मी धान्य आणिक घेणारे !
माझ्या राजाच्या घरी , नित्य माणूस येणार !! 2 !!
पिकलं सीताफळ, हिरवी त्याची काया
रागीट भतारीची, पोटात त्याची माया !! 3 !!
माझा भरात, आंबा गार डौलदार !
यांच्या सावलीला झोप येते मला गार !! 4 !!
अशा माझ्या पतीला आरोग्यदायी ,सुखदायी ,आनंदमय आयुष्य द्यावे हीच परमेश्वरचरणी प्रार्थना !
सौ. दुर्गा सुधीर तांबे
मा. नगराध्यक्षा
संगमनेर नगर परिषद
जि.अहमदनगर