गोदावरी दूध संघाचा जल्लोषात साजरा होणार सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम
गोदावरी दूध संघाचा जल्लोषात साजरा होणार सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम
गोदावरी दूध संघाचा जल्लोषात साजरा होणार सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम
कोपरगाव विजय कापसे दि १७ जानेवारी २०२५– सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा कोपरगाव येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ आपल्या वाटचालीचे ४९ वर्ष पूर्ण करत ५० व्या वर्षात पदार्पण करत असून हा सुवर्ण महोत्सव संघाच्या कार्यस्थळावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या शुभहस्ते मोठ्या जल्लोषात विविध प्रकल्पाच्या उद्घाटनाने संपन्न होणार असल्याची माहिती चेअरमन राजेशआबा परजणे यांनी दिली आहे.
सोमवार दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता संघाच्या कार्यस्थळावर राज्याचे जलसंपदामंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रम प्रसंगी राज्याचे कृषिमंत्री ना. माणिकराव कोकाटे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. रमेश बोरणारे, नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंके, पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे चेअरमन मिनेश शहा आदि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
१९७६ साली स्थापन झालेल्या गोदावरी दूध संघाने नियमित शेतकरी दूध उत्पादक यांच्या प्रगतीचा विचार करत दिवसागणिक आपल्या प्रगतीची वाटचाल सुरू ठेवली आहे. आज संघाचे ५० व्या म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण होत असताना संघाच्या माध्यमातून वीज बचतीचे एक पाऊल पुढे टाकत १.५ मेगावॅट (डी.सी) क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती केली आहे, ग्राहकांना परिपूर्ण शुद्ध दूध मिळावे या करिता मिल्क क्लिरिफायर मशीन कार्यान्वित केले आहे, ग्राहकांना उच्च प्रतीचा एक सारखा खवा मिळावा म्हणून अत्याधुनिक असे कंटिन्यूअस खवा मेकिंग मशीन कार्यान्वित केले आहे तसेच नव्याने निर्मिती केलेल्या पाणी शुद्धीकरण यंत्रणेचा व पाणी साठवण टॅंकचा शुभारंभ होणार आहे. त्यासोबतच नेहमीच आपल्या कामगारांचे हीत जोपासत असणाऱ्या संघाच्या संचालक मंडळाने आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकरीता संघाच्या कार्यस्थळावर नवीन घरकुल बांधण्याचा महत्वकांशी निर्णय घेतला असून या घरकुल बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ देखील या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे.तरी आपण सर्वांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेशआबा परजणे, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी यांनी केले आहे.
१९७६ साली स्थापन झालेल्या नामदेवरावजी परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघाने यशाचे एक एक पाऊल पुढे टाकत स्व.नामदेवरावजी परजणे पाटील (आण्णा) यांच्या आशीर्वादाने व संघाचे खंबीर नेतृत्व चेअरमन राजेशआबा परजणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अत्याधुनिक यंत्रणेची कास धरत तयार करत असलेल्या शुद्ध, सकस, निर्मळ दुधासोबतच दुधापासून बनविलेल्या तूप, खवा, लस्सी, पेढा, बर्फी, दही, जिरा ताक, सुगंधी दूध, श्रीखंड, आम्रखंड आदी दर्जेदार उत्पादनांना ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून ग्राहकांचे सण वार यातून नेहमीच गोड होत आहे.