समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा उद्देश – राज्यपाल हरिभाऊ बागडे
समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा उद्देश – राज्यपाल हरिभाऊ बागडे
कोपरगाव येथील गोदावरी दूध संघाच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन
कोपरगाव विजय कापसे दि २० जानेवारी २०२५ – केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष हा सहकाराचा खरा उद्देश आहे, असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.
कोपरगाव तालुक्यातील सहजानंदनगर येथील गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचा व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नवीन घरकुलांच्या बांधकामांच्या पायाभरणीचा शुभारंभ राज्यपाल श्री.बागडे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका दूध उत्पादक संघाचे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आदी उपस्थित होते.
राज्यपाल बागडे म्हणाले, चांगल्या भावनेने सहकार क्षेत्रात काम केल्यास संस्थांना तोटा होत नाही, तोटा झाला तरी त्याची भरपाई अधिक क्षमता वापरून करता येते. देशात सहकार क्षेत्रातील विविध उद्योग मागील ६० वर्षांपासून यशस्वीपणे चालू आहेत.
दूध उत्पादक व सभासद हा खरा दूध संघाचा मालक असतो, असे नमूद करून राज्यपाल बागडे म्हणाले, दूधसंघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे. उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील. दूध उत्पादक व वितरकांनी दूध भेसळ होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. दूध व्यवसाय हा शेतकऱ्याच्या हिताचा असल्याने तो टिकला पाहिजे. दूध उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे, असेही त्यांनी सांगितले.
मदर डेअरीचा उद्योग शिर्डीत सुरू करण्याचा मानस – पालकमंत्री
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, एखादी संस्था सहकारात पन्नास वर्ष पूर्ण करत आहे, ही घटना सहकाराबद्दल लोकांचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे. गायींच्या निकृष्ट दर्जाच्या बीजावर बंदी घालणारा कायदा राज्य शासनाने आणल्याने येत्या काळात गायींच्या संख्येत वाढू होऊन दूध उत्पादन क्षमता वाढणार आहे. राज्यात सर्वाधिक ५३ लाख लीटर दूध उत्पादन अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे. मदर डेअरीचा प्रकल्प शिर्डी औद्योगिक वसाहतीत सुरू करण्याचा मानस असल्याचे ही त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात दूधाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या कमी झाली आहे. राज् यशासनाने शेतकऱ्यांना सात अश्वशक्ती पर्यंत वीज मोफत दिली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे ६५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी जलसंपदा विभागाचे प्रथम प्राधान्य असणार असल्याचेही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते १.५ मेगावॅट (डी.सी.) क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प, दूध शुद्धीकरण मशीन, सतत खवा बनविणारी मशीन, पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि पाणी साठवण टँक या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन राजेश परजणे यांनी केले.