तब्बल १८ वर्षांनंतर गोधेगाव शाळेतील माजी विद्यार्थी आले एकत्र
तब्बल १८ वर्षांनंतर गोधेगाव शाळेतील माजी विद्यार्थी आले एकत्र
कोपरगाव विजय कापसे दि २८ मे २०२४– कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,गोधेगाव या विद्यालयामध्ये २००६ साली दहावीमध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी दिनांक २६ मे २०२४ रोजी संपन्न झाला. तब्बल १८ वर्षानंतर एकत्र आलेले माजी विद्यार्थी तसेच विदयालयांचे सेवानिवृत्त शिक्षक एकमेकांना भेटुन शाळेच्या जुन्या आठवणीत रममाण झाले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षकवृंदाचा सन्मान केला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. माजी विद्यार्थ्यांच्या स्वागतामुळे सर्व शिक्षक वृंद अक्षरशः भारावून गेले. सर्व उपस्थितीतांनी तत्कालीन दिवंगत शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रारंभी विद्यालयाच्या प्रांगणात सरस्वती पूजन,कर्मवीर आण्णा प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करुन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी माजी विद्यार्थी संदीप शिरसाठ व गणेश भोकरे यांनी प्रास्ताविक केले. तसेच शिवाजी शिरसाठ यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याची संकल्पना मांडणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

या वेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या गमतीजमती तसेच आठवणी सांगून सर्वांना भुतकाळात नेले. या वेळी नागरिकांच्या भूमिकेत असलेले विद्यार्थी शाळेत लहान होऊन रमले होते. १८ वर्षांपूर्वी ज्या शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतले त्या शाळेत आज आपली मुले, मुली शिक्षण घेत आहेत या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणीत रममाण होता आले. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आगळावेगळा आनंद ओसंडून वाहत होता.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दाभाडे एम. व्ही. यांचे शिवाजी शिरसाठ व चिंतामण भोकरे यांनी शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. त्यानंतर निवृत्त शिक्षक साळवे सर, प्रशांत कोळसे, खटकाळे सतीश , पाटील सर यांचा रमेश दुशिंग व शैलेश रांधवणे, पंडोरे सर यांचा संतोष टूपके व रवींद्र खिल्लारी, दाभाडे आर. जी. यांचा नारायन दाणे व भाऊसाहेब आहेर, निंबाळकर सर यांचा बाळू गायके व दत्तू गायके, प्राचार्य जुंदारे सर यांचा अनिल गायकवाड व रमेश भानगुडे, वाबळे सर यांचा रोहिणी कोळसे व ज्योती भुजाडे, शिंदे सर यांचा सत्कार निलम शिंदे व रोहिणी शिंदे, गोरे मामा यांचा सत्कार गणेश नेहेरे व अनिल मलिक यांनी सत्कार केले.





