आर्यवीर कराटे अकॅडमीच्या वर्धा पवारची शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

आर्यवीर कराटे अकॅडमीच्या वर्धा पवारची शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड
विभागीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक; सप्तमी डहारे व वैभव गोटे यांना तृतीय क्रमांक
Kopargaon vijay kapss दि २ नोव्हेंबर २०२६ : बारामती (पुणे) येथे दि. ३० व ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या शालेय शासकीय विभागीय कराटे स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आपल्या क्रीडा कौशल्याची छाप उमटवली. या स्पर्धेत आर्यवीर कराटे अकॅडमी, कोपरगावची वर्धा विजय पवार हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिची शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील आठ स्पर्धकांनी यापूर्वी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये वर्धा पवार हिने आपल्या खेळातील सातत्य, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट तंत्राच्या जोरावर विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेची पात्रता मिळवली.

याच विभागीय स्पर्धेत के. जे. सोमय्या ज्युनिअर कॉलेजची सप्तमी डहारे तसेच संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी वैभव गोटे यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष प्रा. सुदर्शन पांढरे व ॲड. स्नेहल पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वर्षा देठे मॅडम, आशुतोष भोसले , शुभम भोजने , यश सांगळे , सरस ठोळे , हर्ष लंगोटे आणि पुष्कर बागडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन स्पर्धकांना मिळाले.

वर्धा पवार हिच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीबद्दल तसेच सप्तमी डहारे व वैभव गोटे यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या वर्धा पवार हिला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.




