साधना महाविद्यालयात सापांन विषयी समज व गैरसमज या विषयाची कार्यशाळा संपन्न
साधना महाविद्यालयात सापांन विषयी समज व गैरसमज या विषयाची कार्यशाळा संपन्न
साधना महाविद्यालयात सापांन विषयी समज व गैरसमज या विषयाची कार्यशाळा संपन्न

हडपसर विजय कापसे दि २९ जुलै २०२५– रयत शिक्षण संस्थेचे, साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनिअर कॉलेज, हडपसर “हरितसेना” अंतर्गत नागपंचमी सणाचे औचित्य साधून ‘सापांन विषयी समज व गैरसमज’ या विषयावर सोमवार दि २८ जुलै रोजी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यालयातील जीवशास्त्र विषयाच्या अध्यापिका पवार एस. जे. मॅडम उपस्थित होत्या.

या कार्यशाळेत श्रीमती पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. मनोगतातून आपले विचार मांडताना त्या म्हणाल्या की, सापांबद्दल आपल्याकडे बऱ्याच निराधार, कपोलकल्पित गोष्टी सांगितल्या जातात. खरे तर साप हा उपयुक्त असला तरी त्याला गैरसमजामुळे शत्रू ठरवून आपण मोकळे झालो आहोत. उद्या होणाऱ्या नागपंचमीच्या निमित्ताने नागांना समजावून घेण्याची खरी गरज आहे. नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. नागाला जगातील अनेक देशांनी देवाचे स्थान दिलेले आहे. आपल्या देशातही नागांचे पर्यायाने सर्पसृष्टीचे महत्त्व आपल्या पूर्वजांनाही ओळखले होते. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे असणाऱ्या द्रविड संस्कृतीत नागांची पूजा केली जात होती. मोहेंजोदडो येथील उत्खननामध्ये नागप्रतीमा सापडल्या असल्याने इसवी सनापूर्वी किमान पाच ते सहा हजार वर्षापूर्वी नागपूजा होत असल्याचे सिद्ध होते. वैदिक धर्माप्रमाणेच बौद्ध व जैन धर्मातही नागाचे स्थान मोठे आहे. परंतु यामध्ये श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धाच जास्त आहेत.

साप म्हणजे मरण ही कल्पना लोकांच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की, साप म्हणताच अनेकांचे अवसान गळते. परंपरागत लोककथा, कहाण्या, गूढकथा, भ्रामक भाकडकथा आणि शास्त्रीय माहितीविषयी अज्ञान या सर्व कारणांमुळे निरुपद्रवी सापाला शत्रू ठरवून मृत्यूदूत बनविले आहे. सापाविषयी अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. साप डूख धरतात. या समजूतीला काहीही शास्त्रीय आधार नाही. सापाचे विष मंत्राने आणि काही प्रकारच्या जडीबुटीने उतरते, या घातक अंधश्रद्धेपायी देशात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. सापाच्या विषावर प्रतिसर्प विष हेच एकमेव औषध आहे. अनेक मांत्रिक देवऋषी आणि गारुडी सापाचे विष उतरविणारी औषधी म्हणून जडीबुटी, नागवेली, तेले, भस्मे, अंगारे आदी विकतात. वास्तविक ते बेन्झाईनचे किंवा प्राण्यांच्या पित्ताशयात तयार झालेले खडे असतात. परंतु यापैकी कशाचाही उपयोग सर्पदंशावर होत नाही.
साप जेवढा शेतकर्यांचा मित्र आहे, त्याहून ज्यादा तो सबंध पृथ्वीवरील मानवजातीचा मित्र आहे. कारण जवळ जवळ ३० टक्के औषधांमध्ये सर्पविष हे औषध म्हणून वापरले जाते उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अंगदुखी, कॅन्सर; तसेच भूल देण्याच्या इंजेक्शनमध्ये या विषाचा वापर होतो. म्हणूनच साप हा मानवाचा मित्र आहे.

कार्यशाळेच्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव , उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षिका माधुरी राऊत, साधना सुर्वे, पर्यवेक्षक अजय धनवडे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबतच या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले ज्युनिअर विभाग प्रमुख सावंत डी. बी. यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यासोबत टेंगले के. एम., भागवत एन. पी., क्षीरसागर टी. टी., लोंढे पी. बी., जाधव व्ही. एन. जुनिअर कॉलेजचे सर्व सहकारी शिक्षक बंधू – भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन हरितसेनेच्या सदस्या साधना खोत यांनी केले. आभार हरितसेना प्रमुख व पर्यावरण शिक्षण विभाग प्रमुख अमोल चंदनशिवे यांनी मानले.




