समृद्ध पंचायत राज अभियानासाठी लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने सज्ज व्हावे – आनंद भंडारी
समृद्ध पंचायत राज अभियानासाठी लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने सज्ज व्हावे – आनंद भंडारी
समृद्ध पंचायत राज अभियानासाठी लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने सज्ज व्हावे – आनंद भंडारी
लोणी विजय कापसे दि २० सप्टेंबर २०२५- देश आणि राज्य पातळीवरील अनेक अभियानात यश संपादन केलेल्या लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात मोठी संधी असून या अभियानासाठी पंचायतीने सज्ज व्हावे असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी केले.

लोणी बुद्रुक येथील डॉ.बाळासाहेब विखे पाटील सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्ध पंचायत अभियानाचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. यावेळी आयोजित ग्रामसभेत श्री.भंडारी बोलत होते.

यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ, गटविकास अधिकारी विवेक गुंड, तहसीलदार अमोल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने झाला. यावेळी सरपंच कल्पना मैड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत बोलताना श्री.भंडारी म्हणाले की, या अभियानात सहभाग घेऊन ग्रामस्थांनी घरपट्टी, पाणीपट्टी, गाळा भाडे भरून सहकार्य करणे गरजेचे आहे. घरकुल लाभार्थ्यांनी वेळेत घरकुलाचे बांधकाम पुर्ण केले पाहिजे. गावात जलसंधारणाची कामे करावीत, वॉटर बजेट करावे, संपूर्ण प्लास्टिक बंदी करावी, ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा संकलन करून घनकचरा व्यवस्थापन करावे, महिला बचत गटातील विविध योजनाबरोबरच अभियानातील सर्व सात मुद्यांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोणी बुद्रुक गावाचा पूर्वीपासून असलेला एकोपा गावाच्या विकासासाठी महत्वाचा ठरला आहे. महिला आणि तरुणांचा मोठा सहभाग ही खरी ताकद आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात लोणी बुद्रुक गाव प्रथम क्रमांचे बक्षीस मिळवण्यात यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करतानाच ग्रामस्वच्छतेत प्रत्येक ग्रामस्थाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतीचे सर्व प्रकारची थकबाकी तातडीने भरावी असे आवाहन केले. महिला बचत गट, आयुष्यमान भारत योजना यामध्ये उत्तम काम झालेले आहे. गावाने निर्माण केलेली आपली ओळख टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सभेला उपसरपंच गणेश विखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे, बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, विकास संस्थेचे उपाध्यक्ष नाना म्हस्के, अनिल विखे, लक्ष्मण बनसोडे, दिलीप विखे, प्रवीण विखे,यभाऊसाहेब धावणे, रामनाथ विखे, भाऊसाहेब विखे, नवनाथ विखे,ससोपान विखे, किशोर धावणे, खंडू धावणे, गणेश विखे, ग्राम विकास अधिकारी सौ.कविता आहेर, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



