वेल्हाळे,मालदाड, खळी, आश्वी येथील देवस्थानांना क दर्जा मंजूर करावा – आ.सत्यजित तांबे यांची मागणी
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आ.सत्यजित तांबे यांची मागणी

संगमनेर विजय कापसे दि ५ फेब्रुवारी २०२५– लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील देवस्थानचा पर्यटन निधीमधून मोठा विकास केला आहे. वेल्हाळे परिसरातील श्री.क्षेत्र हरीबाबा देवस्थान या ठिकाणी अनेक भाविक येत असल्यामुळे या परिसरालाही क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा तसेच मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ देवस्थान,आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थान, खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान व निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थान या तीर्थक्षेत्रांना क वर्गाचा दर्जा मंजूर करावा अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली आहे.


याचप्रमाणे वेल्हाळे येथील श्री.क्षेत्र हरीबाबा देवस्थान हे प्रसिद्ध असून या ठिकाणी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. येथे भौतिक सुविधांचा अभाव असल्याने अनेक भाविकांची गैरसोय होते. तसेच मंदिर परिसर विकसित करणे अत्यंत गरजेचे असल्याने या तीर्थक्षेत्राला क वर्ग देऊन मंदिर परिसराचे सुशोभीकरण व भाविकांसाठी भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी क वर्ग तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत निधी मिळावा व या परिसराचे सुशोभीकरण व विकास करावा.

याचबरोबर मालदाड येथील चैतन्य मच्छिंद्रनाथ मठ देवस्थान, आश्वी बुद्रुक येथील चैतन्य कानिफनाथ महाराज देवस्थान,खळी येथील खंडोबा महाराज देवस्थान व निळवंडे येथील दत्त महाराज देवस्थाना क दर्जा मिळावा व यातून सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी आहे.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली वेल्हाळे व परिसरामध्ये अनेक विकास कामांच्या योजना राबवल्या असून पुढील आठवड्यामध्ये होत असलेल्या हरीबाबा यात्रेच्या निमित्ताने हरिबाबा मंदिराचे सुशोभीकरण व क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा बाबतची केलेल्या मागणीबाबत वेल्हाळे तसेच मालदाड,आश्वी बुद्रुक, खळी, व निळवंडे येथील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात व आ.सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन केले आहे.