सोमैया महाविद्यालयात ‘राष्ट्रीय हिंदी दिवस’ व ‘गोदातरंग प्रकाशन’ सोहळा उत्साहात
सोमैया महाविद्यालयात ‘राष्ट्रीय हिंदी दिवस’ व ‘गोदातरंग प्रकाशन’ सोहळा उत्साहात
सोमैया महाविद्यालयात ‘राष्ट्रीय हिंदी दिवस’ व ‘गोदातरंग प्रकाशन’ सोहळा उत्साहात

कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२५– कोपरगाव सारख्या ग्रामीण परिसरातील या उत्कृष्ट महाविद्यालयात मी पुन्हा पुन्हा येतो ते केवळ येथे शिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांसोबत संवाद साधण्यासाठी आणि अशोकराव रोहमारे साहेबांच्या कार्याला प्रणाम करण्यासाठी. आपण सर्व नदी, शेतकरी, निसर्ग आणि पर्यावरणाची पूजा करतात तर मी झाडांची पूजा करतो. झाडा ंपेक्षा मोठा कोणी संत नाही देश-विदेशात झाडाशिवाय ज्ञानप्राप्ती झालेला संत शोधून सापडणार नाही. आज राष्ट्रभाषा हिंदी दिनाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, हिंदीतील सर्व संत आणि श्रेष्ठ लेखक-कवींनी देखील पर्यावरण-रक्षणाला प्रचंड महत्व दिलेले आहे. परंतु दुर्दैवाने आज पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. म्हणून पर्यावरणाला वाचविण्यासाठी माझ्यासह आपणा सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे.” असे प्रतिपादन हिंदीतील प्रख्यात हास्यकवी आणि पर्यावरणप्रेमी डॉ. मुकेश गौतम यांनी येथे केले. के. जे. सोमैया महाविद्यालय व राष्ट्रभाषा सेवा मंच कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘राष्ट्रीय हिंदी दिवस, शायरी व मौलिक लेखन स्पर्धा पारितोषिक वितरण आणि ‘गोदातरंग’ प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गौतम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते. तर राष्ट्रभाषा सेवा मंच कोपरगाव चे अध्यक्ष पदमकांत कुदळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी डॉ. गौतम यांनी आपल्या निवडक हास्य कविता तसेच काही गंभीर विषयावरील कवितांच्या माध्यमातून उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थाध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि हिंदी भाषेच्या माध्यमातून करीयरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन केले. राष्ट्रभाषा सेवा मंच कोपरगावचे अध्यक्ष मा. पद्मकांत कुदळे म्हणाले की, “या महाविद्यालयात हिंदी आदी भाषांचे शिक्षण घेणारे जास्तीत जास्त विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे या महाविद्यालयाने ‘कोपरगाव तालुक्यातील शेती आणि शेतकरी’ यांना केंद्रस्थानी ठेवून आपला वार्षिकांक गोदातरंग प्रकाशित केला, त्याबद्दल मी महाविद्यालयाला आणि प्रशासनाला लाख लाख धन्यवाद देतो. आज शेतकऱ्यांना तुमच्याकडून काहीही नको. त्यांना फक्त सहानुभूती आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. या देशातील शेतकरी अडचणीत आल्यावर स्वतःला संपवतो, दुसऱ्याचा जीव घेत नाही. हेच त्याचे मोठेपण आहे.”

प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी हिंदी दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना महाविद्यालयाचा वार्षिकांक ‘गोदातरंग’ ची भूमिका विशद केली आणि गेल्या अनेक वर्षातील ‘गोदातरंग’ चे विविध विशेषांक तसेच त्यांना राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले असल्याचे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांना क्रांतीज्योती व क्रांतीसूर्य प्राचार्य प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ‘गोदातरंग’ च्या संपादक मंडळाचा मान्यवरांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या हस्ताक्षर, वक्तृत्व आणि स्वरचित काव्यवाचन तसेच राष्ट्रभाषा सेवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या शायरी व मौलिक लेखन स्पर्धातील पारितोषिक विजेत्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी मराठीतील चेतनाम ग्रामीण साहित्यिक कै भास्कर चंदनशिव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हिंदी विभाग प्रमुख डॉ. जे. एस. मोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पारितोषिकांची घोषणा केली. डॉ. एस. बी. दवंगे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. श्रद्धा खालकर यांनी सूत्रसंचालन केले. रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, प्रा. किरण सोळसे, डॉ. संजय अरगडे, डॉ. रवींद्र जाधव, प्रा. संपत आहेर, राष्ट्रभाषा सेवा मंचचे सुरेश गोरे, योगेश कोळगे, प्रमोद येवले, रोहित लकारे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.



