महायुतीत खदखद वाढली लवकरच मोठा स्फोट होईल; माजीमंत्री बाळासाहेब थोरात ; प्रसार माध्यमांशी साधला संवाद
घराणेशाहीचा आरोप करण्याचा भाजपला काहीही नैतिक अधिकार नाही.

संगमनेर विजय कापसे दि २० नोव्हेंबर २०२५- राज्यातील महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत घुसमट आता तीव्र होत चालली असून या मतभेदांचा मोठा स्फोट लवकरच पाहायला मिळेल, असा ठोस दावा मा.मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. ते संगमनेर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
माजीमंत्री थोरात म्हणाले की, महायुतीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्रचंड वाद – विवाद, आरोप – प्रत्यारोप आणि नाराजीचे वातावरण या सर्व मुद्द्यांवरून मतभेद वाढत आहेत. हे आता उघडपणे समोर येत आहे. ही केवळ सुरुवात आहे ; पुढे याचा मोठा स्फोट दिसेल.

भाजपकडून काँग्रेस व महाविकास आघाडीवर होणाऱ्या घराणेशाहीच्या टीकेला उत्तर देताना थोरात म्हणाले, घराणेशाहीचा आरोप करण्याचा भाजपला काहीही नैतिक अधिकार नाही. त्यांच्याच पक्षात अनेक लोकप्रतिनिधी एकाच कुटुंबातून येतात आणि उच्च पदांवर विराजमान आहेत. निवडणूक आयोगासारख्या महत्त्वाच्या संवैधानिक संस्थेने स्वायत्त आणि निर्भीड राहिले पाहिजे. मात्र दुर्दैवाने आयोग स्वतःचे निर्णय घेत नाही. बाहेरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचीच अंमलबजावणी होते असे दिसते. त्यामुळेच लोकांचा आयोगावरचा विश्वास ढासळला आहे.




