सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त १४ मार्च रोजी विविध कार्यक्रम

ज्येष्ठ संपादक मल्हार अरणकल्ले यांचे व्याख्यान

संगमनेर विजय कापसे दि ११ मार्च २०२६– अमृत उद्योग समूहाचे जनक स्वातंत्र्यसेनानी आणि महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे प्रेरणास्थान असलेले सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतीस्थळी आदरांजली कार्यक्रम तसेच ज्येष्ठ संपादक व लेखक मल्हार अरणकल्ले यांचे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनचरित्रावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सहकार चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याचे मोठे कार्य सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी केले. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्यानंतर त्यांनी आयुष्यभर सहकाराच्या माध्यमातून शेतकरी,कामगार आणि ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी काम केले. जिल्हा सहकारी बँक तसेच राज्य सहकारी बँकेच्या नेतृत्वातून त्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योगांना बळ देण्याचे काम केले. ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, उद्योगविकास आणि सहकाराच्या मूल्यांची रुजवण करण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते.

सचोटी, पारदर्शकता आणि शेतकरी हिताचा ध्यास या मूल्यांवर उभा असलेला अमृत उद्योग समूह ही त्यांच्या कार्याची जिवंत परंपरा मानली जाते. सहकार क्षेत्रात आदर्श मानल्या जाणाऱ्या या कार्याचा गौरव म्हणून दरवर्षी त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात स्मृतीस्थळी आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या सहकार चळवळीतील योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात ज्येष्ठ संपादक आणि लेखक मल्हार अरणकल्ले यांचे भाऊसाहेब थोरात यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानातून भाऊसाहेबांच्या कार्याचा, सहकार चळवळीतील त्यांच्या नेतृत्वाचा आणि ग्रामीण समाजासाठी त्यांनी उभ्या केलेल्या आदर्शांचा आढावा घेण्यात येणार आहे.

तसेच शुक्रवार, दि.13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता, सभागृह, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, प्रशासकीय भवन येथे ‘भजनसंध्या’ आयोजित केलेली आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ.सुधीर तांबे, अमेय पब्लिकेशन्सचे प्रमुख उल्हास लाटकर, आमदार सत्यजित तांबे, ॲड.माधवराव कानवडे, सौ.दुर्गाताई तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख,पांडुरंग पा.घुले,बाबा ओहळ,शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे,हौशीराम सोनवणे, संपतराव डोंगरे,डॉ.मैथिलीताई तांबे, अजय फटांगरे,सोमेश्वर दिवटे, गणपतराव सांगळे,रामदास वाघ,अर्चनाताई बालोडे, प्रा.बाबा खरात, प्राचार्य केशवराव जाधव, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, ॲड.सुहास आहेर,सुभाष सांगळे,निखील पापडेजा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी, कामगार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे पांडुरंग पाटील घुले, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व अमृत उद्योग समूह यांच्या वतीने करण्यात आले आहे.



