गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन संपन्न

गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन संपन्न
गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि १४ मार्च २०२६– कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट गौतमनगर येथे मंगळवार दि. १० रोजी मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या वतीने आयोजित रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन कर्मवीर शंकरराव काळे शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त ज्ञानदेव मांजरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे शैक्षणिक निरीक्षक नारायण बारे, प्राचार्य वसीम शेख व कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे उपस्थिती होते.

वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानप्रधान युगात विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किंवा सैद्धांतिक ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तांत्रिक कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज बनली असून याच उद्देशाने रोबोविश्व रोबोटिक्स क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नव्या तांत्रिक संकल्पना समजून घेण्यास आणि स्वतःचे नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करण्यास मोठी मदत होणार आहे.

आगामी काळात क्लबच्या माध्यमातून विविध रोबोटिक्स आणि ३डी प्रिंटिंग वर्कशॉप, तांत्रिक सेमिनार, प्रोजेक्ट स्पर्धा, टेक्निकल एक्झिबिशन तसेच औद्योगिक क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन सत्राचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रोबोट डिझाईन करणे, प्रोग्रामिंग करणे आणि विविध सेन्सर व मायक्रोकंट्रोलर वापरून प्रत्यक्ष कार्यरत मॉडेल्स तयार करण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय रोबोटिक्स स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करून त्यांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

रोबो विश्व क्लबमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड, सर्जनशीलता, टीमवर्क आणि क्लिष्ट समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होईल. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणारे कुशल आणि आत्मविश्वासू अभियंते घडले जाती असा विश्वास कर्मवीर शंकरराव काळे शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त ज्ञानदेव मांजरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.

मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्रा. गौरव जोशी यांनी प्रस्तावनेतून रोबोविश्व क्लबचे व्हिजन व मिशन उपस्थितांसमोर मांडले. विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान, सर्जनशीलता आणि नवोपक्रमाची भावना विकसित करणे हा या क्लबचा मुख्य उद्देश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य वसीम शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचा समारोप प्रा. सादिक शेख यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.



