आपला जिल्हा
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर
टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचे राजहंसचे टँकर वरदान
कुटुंबप्रमुख म्हणून लोकनेते बाळासाहेब थोरात कायम जनसेवेत

Sangmner vijay kapse दि २९ मार्च २०२६– संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून पठार भाग, प्रवरा पट्टा व तळेगाव पट्टा असे भौगोलिक तीन विभाग आहेत. पर्जन्य छायामुळे तालुक्यात कमी पाऊस होत असून उन्हाळ्यामध्ये काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्रता जाणवत आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम अडचणीमध्ये जनतेला मदत केली असून दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मदत व्हावी याकरता राजहंस दूध संघाकडून पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जात असून नागरिकांना ही मोठी मदत होत आहे.

संगमनेर तालुक्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांमधील जनतेसाठी शेती व पिण्याच्या पाण्याची शाश्वत सुविधा व्हावी याकरता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनंत अडचणींवर मात करून निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला. निळवंडे धरणात आलेल्या पाण्यामुळे या दोन्ही कालव्यांमधून पाणी मिळत असल्याने अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न मिटला आहे. निळवंडेचे पाणी लाभ क्षेत्रातील सर्व नागरिकांना मिळालेच पाहिजे यासाठी निळवंडे धरणाचे निर्माते बाळासाहेब थोरात यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असून कॅनॉलच्या वरील बाजूच्या शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी त्यांनी पायाभूत आखणी करून ठेवली आहे. ती फक्त मार्गी लावण्याचे काम नव्या सरकारला करायचे आहे.

या शाश्वत सुविधेबरोबर उन्हाळ्यामध्ये काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यास सहकारातील विविध संस्थांनी वेळोवेळी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम टंचाई पूर्वीच काळजी घेत तालुक्यातील जनतेला दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली असून पठार भागातील काही गावे व वाड्या वास्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. शासनाची मदतीची वाट न पाहता जनतेच्या मागणीवरून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे चार टँकर पुरवले जात आहे. सध्या गुंजाळवाडी पठार, वरुडी पठार,सारोळे पठार,डोळासने या पठार भागातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर नागरिकांच्या मदतीला येत आहे. यामुळे पठार भागातील महिलांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून टॅंकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी महिलांची टाकीवर गर्दी होत आहे.

येताना पाणी घेऊन यायचे आणि जाताना दूध घेऊन जायचे असा दिनक्रम या टँकरचा बनला असून दूध व्यवसायामुळे तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. त्या शेतकऱ्यांना व नागरिकांना पिण्याच्या पाणी ची सुविधा देण्याकरता राजहंस दूध संघाने कायम पुढाकार घेतला आहे. राजहंस दूध संघाने केलेल्या या मदतीबद्दल पठार भागातील विविध गावांमधील नागरिकांनी दूध संघ व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले आहे.
संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून 171 गावे व 258 वाड्या वस्त्या आहेत. प्रत्येक गावातील नागरिकांना अडचणी येऊ नये यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात हे कायम तालुक्यातील जनतेच्या अडचणींवर लक्ष ठेवून असून सातत्याने जनतेला मदत करत आहेत. संगमनेर तालुका हा एक परिवार असून प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा मिळावा याकरता सातत्याने विकासाच्या योजना राबविल्या आहेत. उन्हाळ्यात नागरिकांना अडचण येऊ नये याकरता सहकारासह राजहंस दूध संघाने शासनाच्या मदतीची वाट न पाहता मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जात असल्याचे दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे. राजहंस दूध संघाच्या या निर्णयामुळे विविध गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.