उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरण अधिकाऱ्यांची पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी घेतली आढावा बैठक

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरण अधिकाऱ्यांची पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी घेतली आढावा बैठक
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरण अधिकाऱ्यांची पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी घेतली आढावा बैठक

Loni vijay kapse दि ९ मे २०२६– वीजपुरवठा खंडित होण्याच्या वाढत्या तक्रारी पाहता, महावितरण कंपनीने शेतकरी आणि घरगुती ग्राहकांसाठी अधिक पारदर्शकतेने काम करण्याची आवश्यकता आहे. राज्य भारनियमनमुक्त करण्यासाठी महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. स्थानिक पातळीवर योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून संध्याकाळच्या भारनियमनात कपात करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. तसेच कृषी पंपांना दिवसा वीजपुरवठा कसा करता येईल, याचाही आराखडा तयार करावा,” असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील महावितरणच्या विविध समस्या व उपाययोजनांबाबत जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील वीज भारनियमन तसेच सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

“पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले की, ‘कृषी पंपधारकांना सौर ऊर्जेबाबत प्रोत्साहन देऊन व्यापक जनजागृती करावी लागणार आहे. महायुती सरकारने यासाठी स्वतंत्र धोरण स्वीकारले आहे. सौर ऊर्जा योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.’ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांसाठी सौर पंपांचा वापर वाढविण्यासाठी महावितरण व ग्रामपंचायत प्रशासनाने संयुक्त प्रयत्न करावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या पाझर तलावांवर सौर पंप उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. सध्या परिसरात वाढत असलेल्या चोऱ्या व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, रात्रीचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणने विशेष प्रयत्न करावेत, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.”

“वादळामुळे वीज यंत्रणेचे नुकसान होऊ नये, यासाठी वाकलेले पोल, मोडलेले खांब तसेच वीजवाहिका तारांना झाडांच्या अनावश्यक फांद्यांचा अडथळा होत असेल, तर पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करून तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महावितरणच्या विविध योजना, नियोजित वीजपुरवठा खंडित होण्याची माहिती आणि इतर सेवा समाजमाध्यमांतून (Social Media) नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी. “शेतकऱ्यांना वेठीस न धरता त्यांच्या हितासाठी काम करा,” असा स्पष्ट सल्लाही मंत्री विखे पाटील यांनी यावेळी दिला.”
“या बैठकीस कार्यकारी अभियंता पी. आर. वटमवार, उपकार्यकारी अभियंता डी. डी. पाटील, सहाय्यक अभियंता के. एस. खरगे, के. एन. दंडवते, श्री. जाधव, डी. एस. मुळे, रोहित तायडे, पी. डी. परदेशी यांच्यासह विविध उपविभागांचे कनिष्ठ अभियंते उपस्थित होते.”


