कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

Kopargaon vijay kapse दि १५ जून २०२६– रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर शंकररावजी काळे माध्यमिक विद्यालय, करंजी येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा पहिला दिवस “प्रवेशोत्सव” म्हणून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत, गुणवंतांचा गौरव, मोफत पाठ्यपुस्तक वितरण तसेच नव्याने नियुक्त झालेल्या स्थानिक स्कूल कमिटीचा सत्कार अशा विविध उपक्रमांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली.

या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवण, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सांडूभाई पठाण, डॉ. सुनील देसाई, डॉ. तेजल आगवण, एकनाथ कापसे, बाळासाहेब भिंगारे, श्री. कोल्हे, श्री. चरमळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर माळी तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची देवता सरस्वती तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक व आराध्य दैवत कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ. लक्ष्मीबाई (वहिनी) यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि शुभेच्छा देत स्वागत करण्यात आले.

यावेळी शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संच प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळेवर उपलब्ध होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. सुनील देसाई यांनी विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि आपल्या गावाचा विकास साधावा, असे प्रतिपादन केले. यावेळी एकनाथ कापसे यांनी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देताना सांगितले की, “ही शाळा तुमच्या पूर्वीच्या शाळेप्रमाणेच आपली आहे. येथे कार्यरत असलेले शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच देणार नाहीत, तर त्यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व वैयक्तिक समस्या समजून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहतील. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता मनापासून शिक्षण घ्यावे, शिक्षकांशी मुक्तपणे संवाद साधावा आणि आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.

तर मा. कारभारी मारुती आगवण यांनी शिक्षणाचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना शिस्त, परिश्रम आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले. डॉ. तेजल आगवण यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी संदेश दिला. याप्रसंगी इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या विभागप्रमुख चौधरी मॅडम आणि श्री. पिंपळे सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ते २०२८-२९ या कालावधीसाठी रयत शिक्षण संस्थेकडून नियुक्त करण्यात आलेल्या स्थानिक स्कूल कमिटीचाही यावेळी गौरव करण्यात आला. या समितीमध्ये ज्येष्ठ सदस्य म्हणून कारभारी आगवण, सांडूभाई पठाण आणि डॉ. सुनील देसाई यांची पुनर्नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सचिन डांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टाकसाळ सर, चौधरी मॅडम, डांगे सर, ठाकरे सर, पिंपळे सर, गायकवाड सर, डोखे मामा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.




