दिंडी, रिंगण सोहळा आणि हरिनामाच्या गजराने गौतम पब्लिक स्कूल परिसर दुमदुमला

दिंडी, रिंगण सोहळा आणि हरिनामाच्या गजराने गौतम पब्लिक स्कूल परिसर दुमदुमला
आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांना धार्मिक परंपरा, संस्कार आणि वारकरी परंपरेचे अनोखे धडे
Kopargaon vijay kapse दि २५ जुलै २०२६ : आषाढी एकादशीचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे यंदाही गौतम पब्लिक स्कूलमध्ये वारकरी परंपरेचा संस्कारमय वारसा जपत दिंडी, रिंगण सोहळा आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणीच्या नामस्मरणाने, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. धार्मिक परंपरा आणि आधुनिक शिक्षणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख रेखा जाधव यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व आणि वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेची माहिती दिली. कला-संगीत शिक्षक गोरक्षनाथ चव्हाण व संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी अभंग, भजने, गवळणी आणि अखंड विठ्ठलनामाच्या गजराने वातावरण भक्तिमय केले.
यावेळी प्राचार्य नूर शेख यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन व अश्वपूजन करून सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात विद्यार्थ्यांची दिंडी हनुमान ग्राउंडकडे रवाना झाली.

हनुमान ग्राउंडवर पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवत विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन हरिनामाचा अखंड गजर केला. या भक्तिमय वातावरणामुळे उपस्थित पालक, शिक्षक आणि नागरिकांनाही प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन दिंडी आणि रिंगण सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.
संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, विश्वस्त आमदार आशुतोष काळे, सचिव चैतालीताई काळे, इन्स्पेक्टर नारायण बारे, संस्थेचे पदाधिकारी तसेच पालकांनी या संस्कारक्षम उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फिजिकल डायरेक्टर रमेश पठारे यांच्यासह ज्योती शेलार, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद, नसीर पठाण, जगदीश गिरी आणि प्रकाश भुजबळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी रमेश पठारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
“शिक्षण आणि संस्कार यांची सांगड घालणे हेच आमचे ध्येय”
आषाढी एकादशी हा श्रद्धा, भक्ती आणि संस्कारांचा पवित्र उत्सव आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि नैतिक मूल्यांचे संस्कार मिळावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी आयोजित होणारा दिंडी व रिंगण सोहळा हा शिक्षण, संस्कृती आणि भक्ती यांचा सुंदर संगम आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सेवाभाव, सामूहिकता आणि संस्कारांची जपणूक होते. भविष्यातही असे संस्कारमय उपक्रम सातत्याने राबविण्यास संस्था कटिबद्ध आहे, असे चैतालीताई काळे यांनी सांगितले.



