सोमैया महाविद्यालयात ‘अमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत विशेष व्याख्यान’

सोमैया महाविद्यालयात ‘अमली पदार्थ विरोधी अभियानांतर्गत विशेष व्याख्यान’
अमली पदार्थांपासून तरुणांनी दूर राहावे; चांगुलपणा हीच खरी देशभक्ती – वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे

Kopargaon vijay kapse दि २५ जुलै २०२६ : “२६ जून हा दिवस दरवर्षी भारतभर अमली पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे इंटरनेट व स्मार्टफोनच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी, तर दुसरीकडे अमली पदार्थांच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. ही बाब देशासाठी चिंताजनक आहे. समज-अपसमजामुळे तरुण तंबाखूजन्य पदार्थ, ई-सिगारेट आदींच्या माध्यमातून अमली पदार्थांकडे आकर्षित होतात. त्यामुळे देश व समाजाचे मोठे नुकसान होते. म्हणून तरुणांनी वेळीच सावध होऊन अमली पदार्थांच्या राक्षसापासून दूर राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे यांनी केले.

स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ध्येयपूर्ती अॅकॅडमी आणि कोपरगाव शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अमली पदार्थ विरोधी अभियान’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.
यावेळी मार्गदर्शन करताना ढमाळे म्हणाले, “अमली पदार्थांशी नाते म्हणजेच ‘असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ’ होय. अमली पदार्थांच्या आहारी गेलेला माणूस सदसद्विवेकबुद्धी गमावतो. त्यामुळे समाज व देशाच्या हितासाठी अशा जनजागृतीपर अभियानांना सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद आवश्यक आहे. चांगुलपणा हीदेखील एक प्रकारची देशभक्तीच आहे. स्मार्टफोनच्या अतिवापराचे व्यसनही तितकेच घातक असून त्याऐवजी तरुणांनी वाचन, अभ्यास आणि ज्ञानार्जनाचा आनंद घेत ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास ते देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतील.”

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले, “सोमैया महाविद्यालयात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सहकार्याने विद्यार्थीकेंद्रित आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जातात. आजचा कार्यक्रमही त्याच मालिकेतील महत्त्वाचा उपक्रम आहे. महाविद्यालयाने गेल्या 64 वर्षांत अनेक कर्तृत्ववान अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, वकील, समाजसुधारक आणि आदर्श नागरिक घडविले आहेत. आज या परिसरातील चौथी पिढी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट कॉलेज पुरस्कार’ मिळाल्याचा आम्हाला अभिमान असून विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा.”
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे तसेच त्यांचे सहकारी श्रीकांत कुर्हाडे यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कला शाखाप्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. सुरेश देवरे यांनी आभार मानले, तर डॉ. रवींद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास विज्ञान शाखाप्रमुख डॉ. बापूसाहेब भोसले, वाणिज्य शाखाप्रमुख डॉ. संतोष पगारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. गणेश शिंदे, प्राध्यापकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.



