अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्ष पालक मेळावा उत्साहात संपन्न

अमृतवाहिनी तंत्रनिकेतनमध्ये प्रथम वर्ष पालक मेळावा उत्साहात संपन्न
६२० हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार; गुणवत्ता, कौशल्यविकास आणि उद्योगाभिमुख शिक्षणावर भर

Sangmner vijay kapse दि ५ ऑगस्ट २०२६ : अमृतवाहिनी तंत्रनिकेतन, संगमनेर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा पालक मेळावा सोमवार (दि. ३ ऑगस्ट) रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, पालक-शिक्षक समन्वय आणि गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाचा संदेश देणारा हा मेळावा पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे विशेष ठरला.

हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब थोरात, विश्वस्त डॉ. सुधीर तांबे तसेच कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे व्यवस्थापक तथा प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ, डायरेक्टर अकॅडमिक डॉ. जे. बी. गुरव, उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे, सर्व विभागप्रमुख, पालक प्रतिनिधी आनंदराव वर्पे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डायरेक्टर अकॅडमिक डॉ. जे. बी. गुरव यांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कौशल्यविकास आणि उद्योग क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने स्वतःला अद्ययावत ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्पर्धात्मक युगात केवळ पदवी नव्हे, तर कौशल्ये आणि नवकल्पना यांनाच अधिक महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी संस्थेच्या शैक्षणिक परंपरेचा आढावा घेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत ६२० हून अधिक विद्यार्थ्यांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याची अभिमानास्पद माहिती दिली. अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख शिक्षण, कौशल्यविकास कार्यक्रम, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे अमृतवाहिनी तंत्रनिकेतनने गुणवत्तेची परंपरा कायम राखल्याचे त्यांनी नमूद केले.
उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे यांनी संस्थेतील विविध अभ्यासक्रम, आधुनिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रामाणिक परिश्रम, गुणवत्ता आणि शिस्त यांच्या बळावर पालकांची स्वप्ने साकार करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
प्रथम वर्ष समन्वयक प्रा. जे. के. सातपुते यांनी प्रास्ताविकातून पालक मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालक आणि संस्थेतील सातत्यपूर्ण संवाद व सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थिनी प्रतिनिधी स्नेहा दरंदले हिने विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करत संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या संधींचा लाभ घेऊन उत्कृष्ट यश संपादन करण्याचा निर्धार व्यक्त केला. पालक प्रतिनिधी आनंदराव वर्पे यांनी पालक आणि संस्था यांच्यातील समन्वय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगत पालकांची जबाबदारी अधोरेखित केली.

यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विविध विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळविणारे विद्यार्थी घडविणाऱ्या विषय शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. आर. के. सातपुते, प्रा. एस. एस. तळेकर, प्रा. ए. एस. दिघे, प्रा. ए. बी. शिंदे, प्रा. डी. डी. उगले, प्रा. ए. व्ही. कुलथे, प्रा. ए. जी. शिंदे, प्रा. एस. आर. आवारे, प्रा. पी. व्ही. पाटील, प्रा. बी. के. उगले, प्रा. एस. एस. देशमुख, प्रा. आर. ए. ढेरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष समन्वयक मंडळाने केले, तर प्रा. बी. जी. कुटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



