मंगळवारी वडगाव पान विद्यालयात तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणाचा प्रारंभ
एकविरा फाउंडेशन व मुक्कामार फाउंडेशन च्या वतीने 27 शाळांमधील विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार
लोकनेते बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात व अभिनेत्री इशिता शर्मा यांची उपस्थिती

एकविरा फाउंडेशन आणि अभिनेत्री इशिता शर्मा फाउंडेशन संचलित मुक्कामार या संस्थेच्या वतीने मंगळवारी डी के मोरे विद्यालय वडगाव पान येथे सामंजस्य करार होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की सध्या महिला व मुली सुरक्षित नाहीत. याबाबत आपण सातत्याने आवाज उठवला असून वडगाव पान येथील चिमुकलीवर ॲसिड हल्ला झाला. मात्र पाच महिने उलटूनही आरोपी अद्याप फरार आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

तालुक्यातील किशोरवयीन मुलींमध्ये आत्मसंरक्षण, आत्मविश्वास, स्वयम निर्णय क्षमता, आणि व्यवहारिक आत्मसंरक्षण कौशल्य निर्माण करण्याकरता अभिनेत्री इशिता शर्मा फाउंडेशनच्या वतीने संचलित मुक्कामार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक वर्षभर 27 शाळांमधून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याकरता प्रत्येक शाळेतील दोन शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले असून हे सर्व शिक्षक त्या त्या शाळांमधून आपल्या विद्यार्थिनींना प्रशिक्षित करणार आहेत. वर्षभर या कार्यक्रमाची देखरेख मुक्कामार संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.
मंगळवारी दुपारी 3 वाजता डि.के .मोरे जनता विद्यालय वडगाव पान येथे महाराष्ट्राचे मा. शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात , संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, अभिनेत्री आणि मुक्कामार संस्थेच्या संस्थापक इशिता शर्मा, सौ दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ, प्रशिक्षक अक्षिता कारकेरा, प्रा. बाबा खरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी संगमनेर तालुक्यातील सुमारे 2000 विद्यार्थीनी उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील पदाधिकारी पालक शिक्षक व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन एकविरा फाउंडेशन व मुक्कामार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.




