सुपा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण व स्थानिकांच्या रोजगार प्रश्नांवर कठोर कारवाई करा : ना. राधाकृष्ण विखे पाटील

सुपा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण व स्थानिकांच्या रोजगार प्रश्नांवर कठोर कारवाई करा : ना. राधाकृष्ण विखे पाटील
सुपा औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण व स्थानिकांच्या रोजगार प्रश्नांवर कठोर कारवाई करा : ना. राधाकृष्ण विखे पाटील
Parner vijay kapse दि २३ ऑगस्ट २०२६: सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषित पाण्याच्या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन संबंधित कंपन्यांची माहिती तातडीने संकलित करावी आणि दोषींविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करावा. तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी न देणाऱ्या उद्योजकांना पाठीशी घालू नका, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.

सुपा औद्योगिक वसाहतीतील विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत नागरिक व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार काशिनाथ दाते, भाजपचे अध्यक्ष राहुल शिंदे, प्रा. विश्वनाथ कोरडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी गणेश राठोड यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक प्रश्नाचा आढावा घेतला. समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कंपन्यांकडून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याचा प्रश्न गंभीर असून, अनेक वर्षांपासून हे पाणी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. याची तातडीने दखल घेऊन संबंधित कंपन्यांची माहिती संकलित करावी आणि कारवाईचा अहवाल सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

औद्योगिक वसाहतीतील वाढते अतिक्रमण आणि रस्त्यांच्या समस्येबाबतही बैठकीत चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी निर्धारित वेळेत अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी, असे निर्देश देण्यात आले. सुपा बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. तसेच वाहतूक कोंडीच्या काळात अतिरिक्त संख्येने वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, अनेक उद्योजक बाहेरील कामगारांना रोजगार देत असल्याने स्थानिक तरुणांना नोकरीच्या संधी मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा नागरिक व युवकांनी मांडला. भूमिपुत्रांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त करत मंत्री विखे पाटील यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून आवश्यक माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील आठवड्यात कामगार आयुक्तांसोबत बैठक घेऊन या प्रश्नावर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित युवकांना दिली.



