आपला जिल्हा

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव व प्रबोधन पुरस्कारांचे वितरण

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव व प्रबोधन पुरस्कारांचे वितरण

मराठी शाळांच्या सुधारणेसाठी धाडसाने पुढाकार घ्या : विश्वास पाटील

जाहिरात

Pravara vijay kapse दि २७ ऑगस्ट २०२६:भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालये ही मायमराठीची खरी वस्त्रे आहेत. खरा महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, तर मराठीसाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल,” असे प्रतिपादन ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.

जाहिरात

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव व प्रबोधन पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील होते. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार आशुतोष काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

यंदाचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना प्रदान करण्यात आला. तसेच संहिता राजन, सुरेंद्र दरेकर, मालती इनामदार, सचिन शिंदे, मराठी अभ्यास परिषद, निवृत्ती जोरी आणि संजय गोर्डे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

विश्वास पाटील म्हणाले की, महाराष्ट्राला समृद्ध आणि सुजलाम करायचे असेल तर मायमराठीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल. मराठी शाळा ही आपली खरी मंदिरे आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळा गरुडासारखी उंच भरारी घेत आहेत. त्यामुळे या शाळांना भेट देऊन त्यांचे बळ वाढविण्याची गरज आहे. “तुमच्या खांद्यावर झेंडा कोणताही असू द्या, दांडा मात्र मराठीचाच ठेवा,” असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रवरा परिवाराशी असलेले जुने व जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील व डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या कार्याची प्रेरणा महाराष्ट्राला सदैव मिळत असून विखे-पाटील परिवाराची चौथी पिढीही ही परंपरा पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना उत्तम कांबळे यांनी साहित्यिकांच्या पाठीशी समाज उभा राहतो, हे या पुरस्काराने सिद्ध केले असल्याचे सांगितले. तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या कार्यावर चित्रपट निर्मिती करण्याची सूचनाही त्यांनी केली.

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी प्रवरा परिवाराच्या ३६ वर्षांच्या साहित्य पुरस्कारांच्या वाटचालीचा आढावा घेतला. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या साहित्यिकांना पुढे साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, हा आपला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवराकाठी मराठी साहित्य, कला व संस्कृतीची अभिरुची जपण्याचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे