शेणापासून साकारलेली श्री गणेशमूर्ती ठरतेय पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची प्रेरणा- मा आ स्नेहलता कोल्हे

शेणापासून साकारलेली श्री गणेशमूर्ती ठरतेय पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची प्रेरणा- मा आ स्नेहलता कोल्हे
शेणापासून साकारलेली श्री गणेशमूर्ती ठरतेय पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची प्रेरणा- मा आ स्नेहलता कोल्हे

Kopargaon vijay kapse दि १४ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सुंदर उपक्रम समोर आला आहे. येवला येथील नामांकित कापसे पैठणीच्या संचालिका नुपूर कापसे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता बिपिनदादा कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांची सदिच्छा भेट घेत अहिल्या गोशाळेच्या माध्यमातून गिर गाईच्या शेणापासून साकारलेली आकर्षक व पर्यावरणपूरक श्री गणेशमूर्ती भेट स्वरूपात दिली असता श्रद्धा, परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुरेख संगम घडविणारी ही भेट विशेष भावणारी ठरली असल्याचे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता बिपिनदादा कोल्हे यांनी व्यक्त केले

गणपती बाप्पा हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. गणेशोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि आनंदाचा सोहळा. मात्र, या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाची आहे. याच भावनेतून पैठणी क्षेत्रात नावाजलेल्या येवला येथील कापसे पैठणी उद्योग समूहाच्या वतीने अहिल्या गोशाळेच्या संचालिका नुपूर कापसे यांच्या संकल्पनेतून गिर गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती साकारण्याचा अहिल्या गोशाळेचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.

नुपूर कापसे यांनी दिलेली ही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती केवळ एक भेट नसून, ‘श्रद्धेसोबत पर्यावरणाचीही जपणूक करूया’ असा मोलाचा संदेश देणारी आहे. पारंपरिक भक्तीला आधुनिक पर्यावरणीय जाणिवेची जोड देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
तर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी बोलताना सांगितले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग आणि विसर्जनामुळे होणारे जलप्रदूषण यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात शाडू मातीच्या अथवा गोमयापासून साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
गणरायाची भक्ती करताना निसर्गाचेही ऋण फेडूया, आपल्या पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण जपूया, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे ते पर्यावरणपूरक गणरायाची ही अनोखी भेट दिल्याबद्दल नुपूर कापसे यांचे संपूर्ण कोल्हे परिवाराने आभार व्यक्त केले.तर या प्रसंगी ज्योती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवी काका बोरावके उपस्थित होते



