के.जे.सोमैया महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

के.जे.सोमैया महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन
वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची सवय विद्यार्थ्यांनी जोपासावी’ : डॉ. श्रीहरी पिंगळे
Kopargaon vijay kapse दि १४ सप्टेंबर २०२६ : के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील विज्ञान विद्याशाखेअंतर्गत ‘विज्ञान मंडळा’चे (Science Association) उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने वर्षभर विविध विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

विज्ञान मंडळाचे उद्घाटन डॉ. श्रीहरी पिंगळे, सहयोगी प्राध्यापक व समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, संगमनेर नगरपालिका कला, द. ज. मालपाणी वाणिज्य व ब. न. सारडा विज्ञान महाविद्यालय, संगमनेर यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे, प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. श्रीहरी पिंगळे यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनासोबतच जिज्ञासा आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करणे गरजेचे असल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांनी शिक्षकांना न संकोचता प्रश्न विचारावेत. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी अनुत्तरित प्रश्नांचा मागोवा घेत त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे यांनी भारताच्या विज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा गौरव करताना विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. समाजाभिमुख विविध प्रकल्पांसाठी महाविद्यालयामार्फत निधी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून संशोधन क्षेत्रात आपला ठसा उमटवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी विज्ञान मंडळाने सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे सूचित केले. अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. गायकवाड यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. एन. जी. शिंदे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. आर. व्ही. कदम यांनी केले, तर आभार प्रा. एस. एस. नागरे यांनी मानले.
कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. जी. एस. शिंदे, डॉ. एस. जी. कोंडा यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



