आपला जिल्हा

ज्ञान, संपत्ती आणि प्रतिष्ठा ईश्वराची देणगी ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचे उद्‌गार

ज्ञान, संपत्ती आणि प्रतिष्ठा ईश्वराची देणगी ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचे उद्‌गार

संवत्सरला ऋषीपंचमीनिमित्त गोदाकाठी महिलांची प्रचंड गर्दी

Kopargaon vijay kapse दि. १५ सप्टेंबर २०२६जन्माला येताना माणूस सोबत काहीच घेऊन येत नाही. ज्ञान, संपत्ती, सत्ता आणि प्रतिष्ठा ही सर्व ईश्वराची देणगी आहे. म्हणून माणसाने अहंकार न करता नम्रतेने जगले पाहिजे. नम्रताच माणसाला मोठे बनवते असे उद्‌गार ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे आयोजित किर्तनाद्वारे व्यक्त केले.

जाहिरात

कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किर्तनातून ह. भ. प. मीराबाई मिरीकर भावीक श्रोत्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. गोदावरी नदीमध्ये ऋषीपंचमीनिमित्त लाखो महिला भाविकांनी स्नानांची पर्वणी साधली. त्यानंतर श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचे किर्तन पार पडले. नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक व विश्वस्त वेदांताचार्य ह. भ. प. देविदास महाराज म्हस्के, आमदार आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी ग्रामस्थांच्यावतीने ह. भ. प. मीराबाई व श्री म्हस्के महाराज यांचा सत्कार करुन उपस्थितांचे स्वागत केले.

जाहिरात

ह. भ. प. मीराबाई पुढे म्हणाल्या, भक्ती म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे तर प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे आणि ईश्वराला साक्षी मानून करणे होय. भक्तीने मन शुद्ध होते आणि सत्कर्मानी जीवन सुंदर होते. माणसांचे कर्म शुद्ध असेल, तर जीवनात समाधान नक्कीच येते. ज्याच्याकडे समाधान आहे, तो खरा श्रीमंत आहे. प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाने केलेली भक्ती मनाला शांती व जीवनाला दिशा देते. ज्ञानेश्वरीतील भक्तियोग हा सर्वसामान्य माणसालाही सहज आचरणात आणता येईल, असा प्रेममय मार्ग आहे. मानवी जन्म अमूल्य आहे. पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवता येते; पण गेलेला वेळ परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण सत्कर्म, नामस्मरण आणि परोपकारासाठी उपयोगात आणावा. जन्माला येताना माणूस काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही. मात्र त्याने केलेली सत्कर्मे, दिलेले प्रेम आणि केलेली सेवा यांची आठवण समाजाच्या मनात कायम राहते असेही मीराबाई यांनी सांगितले.

जाहिरात

वेदांताचार्य ह. भ. प. देविदास महाराज म्हस्के यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, संतांची संगत असेल तर जीवनाला दिशा मिळतेच. संतविचार मनात रुजले की वाईट सवयी दूर होतात, विवेक जागृत होतो आणि भक्तीचा मार्ग सुकर तर होतोच, परंतु भक्ती, सदाचार, आत्मचिंतन आणि जीवनमूल्यांची प्रेरणा त्यातून मिळते. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या शिकवणीनुसार मनुष्याला कर्म टाळून जीवन जगता येत नाही. कर्म करणे हाच मनुष्याचा धर्म आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार आणि कर्तव्याप्रमाणे कर्म करावे. कर्मापासून पळ काढणे हा मुक्तीचा मार्ग नाही. ज्ञानेश्वरीतील कर्मयोग केवळ स्वतःच्या कल्याणापुरता मर्यादित नाही. ज्ञानी आणि कर्तव्यनिष्ठ व्यक्तीने समाजाच्या हितासाठीही कार्य करावे. आपल्या आचरणातून इतरांना योग्य मार्ग दाखवावा, हा लोकसंग्रहाचा विचार कर्मयोगात महत्त्वाचा आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी कर्माला ज्ञानाची दिशा, भक्तीची जोड आणि सदाचाराचा आधार दिला तर आहेच, परंतु आत्मा हा नित्य, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त असल्याचे देखील संत ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. शरीर नश्वर असले तरी आत्मतत्त्व अविनाशी आहे. वेदाभ्यासाचा खरा उपयोग म्हणजे या आत्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त करणे. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी, तिला नीती व तत्वज्ञानाची जोड दिली तर आसक्तीपासून माणूस दूर जातो. अनासक्त माणसांनी लोकोध्दाराच्या कार्यात समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे हीच शिकवण वारकरी सांप्रदायाने आपल्याला दिलेली असल्याचेही ह. भ. प. म्हस्के महाराज यांनी सांगितले.

किर्तनापूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ह. भ. प. मीराबाई मिरीकर व वेदांताचार्य देविदास म्हस्के महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. यंदा गोदावरीतून पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता. संवत्सरला श्री क्षेत्र पंढरीचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यातच किर्तन श्रवणाचा लाभ मिळत असल्याने औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर अशा विविध ठिकाणावरुन भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे