आपला जिल्हा

कोपरगावात ‘भूत’ निघाल्याची चर्चा; अंनिस-पोलिसांच्या तपासात अफवेचे बिंग फुटले

कोपरगावात ‘भूत’ निघाल्याची चर्चा; अंनिस-पोलिसांच्या तपासात अफवेचे बिंग फुटले

सोशल मीडियावर पसरले फोटो; जखमी व्यक्तीचा शोध घेतला असता रुग्णालयात दाखलच नसल्याचे स्पष्ट

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १५ सप्टेंबर २०२६: शहरातील बेट भागात सोमवारी रात्री ‘भूत निघाले’ अशी चर्चा सोशल मीडियावर वेगाने पसरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सफेद साडीतील विचित्र रूपातील एका महिलेने एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला जखमी केल्याचे सांगत संबंधित महिलेचे व जखमी व्यक्तीचे फोटो समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित करण्यात आले. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास केल्यानंतर हे फोटो व त्यामागील कथा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

जाहिरात

मंगळवारी सकाळी एका जागरूक नागरिकाने या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांना दिली. जखमी व्यक्तीला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर चांदगुडे यांनी अंनिसचे कोपरगाव तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे यांच्याशी चर्चा केली.

दोघांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता, अशा प्रकारचा कोणताही जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल झालेला नसल्याचे समोर आले. त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी बेट परिसरात जाऊन नागरिकांकडून माहिती घेत या प्रकाराची सखोल चौकशी सुरू केली.

जाहिरात

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी पोलिसांची मदत घेतली. कोपरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी सोशल मीडियावर हे फोटो पुढे पाठविणाऱ्या कोकमठाण व बेट परिसरातील संबंधित व्यक्तींना पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. तपासादरम्यान हे फोटो अमावस्येच्या रात्री शिर्डीहून प्रसारित झाल्याचे समोर आले. तसेच सोशल मीडियावर फिरत असलेले फोटो बनावट असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित व्यक्तींनीही चुकीची माहिती असलेले फोटो पुढे पाठवल्याची कबुली दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना कोणत्याही घटनेची खात्री न करता फोटो, व्हिडिओ किंवा अफवा समाजमाध्यमांवर पुढे पाठवू नयेत, असे सांगितले.

सोशल वर फिरत असलेला फोटो

दरम्यान, ‘भूत अस्तित्वात असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये,’ असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते डॉ. अशोक गावित्रे, दीपक शिरसाठ आणि कृष्णा चांदगुडे यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे