आपला जिल्हा

पारनेरमध्ये नगरसेवक युवराज पठारे यांच्या बैलपोळा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

पारनेरमध्ये नगरसेवक युवराज पठारे यांच्या बैलपोळा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

पारनेरमध्ये नगरसेवक युवराज पठारे यांच्या बैलपोळा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण

Parner vijay kapse दि २ ऑक्टोबर २०२६-ढोल-ताशांचा गजर, आकर्षक सजविलेल्या बैलजोड्या, पारंपरिक वेशभूषा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग अशा उत्साही वातावरणात पारनेर शहरात नगरसेवक पै. युवराज पठारे यांच्या वतीने भव्य बैलपोळा महोत्सव उत्साहात पार पडला. मिरवणुकीदरम्यान समर्थकांकडून देण्यात आलेल्या ‘भावी नगराध्यक्ष… युवराज पठारे!’ या घोषणांनी विशेष लक्ष वेधून घेतले. आगामी पारनेर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणांमुळे शहरातील राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.

जाहिरात

पारनेर शहरात रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेत बैलपोळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पद्धतीने बैलांचे पूजन करून त्यांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात शहरातून भव्य बैलजोडी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिकांसह युवकांचा मोठा सहभाग होता.
महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली ती महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध बैलगाडा शर्यती व प्रदर्शनांमध्ये तब्बल ३६ वेळा प्रथम क्रमांक पटकावलेली विशेष बैलजोडी. २२ महिन्यांची व दोन दाती असलेल्या या बैलजोडीची किंमत ६ लाख ५१ हजार रुपये असल्याचे आयोजकांनी सांगितले. ही बैलजोडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

जाहिरात

मिरवणुकीदरम्यान युवक व समर्थकांनी नगरसेवक युवराज पठारे यांच्या समर्थनार्थ ‘भावी नगराध्यक्ष’ अशा घोषणा दिल्या. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घोषणांमुळे पठारे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी नगरसेवक युवराज पठारे यांनी आगामी राजकीय नेतृत्वाबाबत भूमिका मांडताना, “माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार काशिनाथ दाते यांच्या विचारांचा नगराध्यक्ष येणाऱ्या काळात पारनेर शहराला मिळेल. आम्हीच येथे कायम आहोत, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी हा गैरसमज दूर करावा,” असे सांगितले.

जाहिरात

बैलपोळा महोत्सवामागे कोणताही राजकीय हेतू नसून पारंपरिक संस्कृतीचे जतन करणे आणि वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा मुख्य उद्देश असल्याचेही पठारे यांनी स्पष्ट केले.
महोत्सवानिमित्त आयोजित रिल्स स्पर्धेलाही युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध स्पर्धकांनी महोत्सवातील क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपून रिल्स तयार केल्या. सहभागी स्पर्धकांना नगरसेवक युवराज पठारे मित्र परिवाराच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाला आमदार काशिनाथ दाते, ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व कुंडलिक पठारे, युवा नेते मंगेश दाते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. श्रीकांत पठारे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चेडे, माजी नगराध्यक्ष नितीन अडसूळ, शिवसेना तालुकाप्रमुख अरुणराव ठाणगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पठारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
तसेच दत्तानाना पवार, मनोज मुंगसे, अर्जुन भालेकर, योगेश मते, विकास रोकडे, सुभाष सासवडे, सतीश पिंपरकर, दत्ता दिवटे, निवृत्ती वरखडे, किरण कोकाटे, ऋषिकेश गंधाडे, यशवंत पठारे, प्रवीण पठारे, प्रदीप नगरे, प्रसाद कर्णावट आदी उपस्थित होते.
बैलपोळ्याच्या पारंपरिक उत्सवातून शेतकरी संस्कृतीचा जागर झाला असतानाच मिरवणुकीत घुमलेल्या ‘भावी नगराध्यक्ष युवराज पठारे’ या घोषणांमुळे पारनेरच्या आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांनाही नवे वळण मिळाले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे