आत्मा मालिक कुस्ती केंद्राची शालेय ज्युडो स्पर्धेत विक्रमी कामगिरी

आत्मा मालिक कुस्ती केंद्राची शालेय ज्युडो स्पर्धेत विक्रमी कामगिरी
१३ सुवर्ण आणि १४ रौप्य पदकांची कमाई; सुवर्णपदक विजेत्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Kopargaon vijay kapse दि २ ऑक्टोबर २०२६–जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत तब्बल १३ सुवर्ण आणि १४ रौप्य पदकांची कमाई केली. या उल्लेखनीय यशामुळे आत्मा मालिक कुस्ती केंद्राने जिल्हास्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटविला आहे.

नेवासे येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे क्रीडा व युवक संचालनालय तसेच जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय ज्युडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनगटांत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदकांवर आपले नाव कोरले.
१३ सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची येत्या ४ ऑक्टोबर रोजी सोलापूर येथे होणाऱ्या पुणे विभागीय शालेय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे आगामी विभागीय स्पर्धेतही या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या यशामुळे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला आणखी बळ मिळाले आहे. कुस्तीबरोबरच ज्युडो या क्रीडा प्रकारातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय प्रगती केल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.
सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचे आशीर्वाद विद्यार्थ्यांना लाभले. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक भरत नायकल, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक विवेक नायकल, प्रशिक्षक राजू पाटील व अक्षय डांगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.




