राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत १५७ विद्यार्थ्यांची प्रभात फेरी

राष्ट्रपिता महात्मा गांधींमुळे जगात देशाची ओळख—मा.आ. डॉ सुधीर तांबे
संगमनेर मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जयहिंद लोकचळवळीच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी व गांधी भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयापासून १५७ विद्यार्थ्यांच्या गांधी वेशभूषेतील प्रभात फेरी व गांधी भजनांनी संगमनेर शहर आज दुमदुमले. संगमनेर बसस्थानकावर गांधी भजन व अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी मा.आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, प्रा हिरालाल पगडाल, डॉ नामदेवराव गुंजाळ, प्रा बाबा खरात, प्रा प्रकाश पारखे, डॉक्टर बाळासाहेब वाघ, एस एम खेमनर, ॲड मधुकर गुंजाळ यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेर बसस्थानकावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची सुंदर रांगोळी तुषार भोसले यांनी काढली. तर सुगंध जाधव यांनी त्यांचे चित्र रेखाटले. याचबरोबर ओंकार मोरे व कृष्णा चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसमोर महात्मा गांधी यांची मूर्ती बनवली. यावेळी बोलताना मा आ डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री हे देशाचे सुपुत्र भारतरत्न आहेत. जगामध्ये महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांच्यामुळे भारताची ओळख निर्माण झाली आहे. अहिंसा आणि सत्य हे तत्व त्यांनी दिले. पाचशे विविध राज्यांमध्ये विभागलेला देश एकत्र आणण्याचे काम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केले असून जात-पात धर्म विसरून स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वांना एकत्र केले .असहकार चळवळ, मिठाचा सत्याग्रह,चलेजाव आंदोलन ही त्यांची मोठी आंदोलन होती. मात्र विविध २१ सामाजिक चळवळी सुद्धा त्यांनी केल्या हे त्यांचे वेगळेपण आहे.

नैतिकता व निर्भयता ही त्यांची शक्ती स्थळे होती. आज देशामध्ये सत्य आणि असत्याची लढाई सुरू आहे. गांधीजींबद्दल काही लोक अपप्रचार करत आहेत. परंतु गांधीजींचे विचार कधीही मारले जाणार नाही . जगात शांतता व आनंद निर्माण होण्यासाठी गांधी विचार गरजेचे आहे . दुर्दैवाने देशातले सध्याचे सत्ताधारी यांच्याकडे नैतिकता नसल्याची खंत व्यक्त करताना गांधी विचार हा शाश्वत मानवतेचा विचार असून हा विचार जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रा. हिरालाल पगडाल म्हणाले की जगामध्ये बुद्ध आणि गांधींच्या विचारांची गरज आहे. सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात गांधी विचार पुढे नेण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया
तर प्रा. विनोद राऊत, अविनाश कदम, गणेश गोरडे मंगेश बिडवे सौरभ रणधीर यांनी रघुपती राघव राजाराम, वैष्णव जनतो, आज का दिन बडा महान ,भारत के दो फुल खिले जिसमे महेका हिंदुस्तान, माझे माहेर पंढरी, देदी हमे आजादी, किया हम पे अहसान यांसह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आवडणारी विविध भजने सादर केली. या भजनांमध्ये उपस्थित सर्वांनी सहभाग घेतला. यावेळी सुरेश झावरे, निखिल पापडेजा, अनंत शिंदे, हर्षल थेटे, चांगदेव खेमनर यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्रा. प्रकाश पारखे यांनी केली सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी आभार मानले. याप्रसंगी संगमनेर शहरातील नागरिक विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रभात फेरी व गांधी भजनांनी संगमनेर दुमदुमले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा केलेली १५७ विद्यार्थी, कस्तुरबा यांची वेशभूषा केलेल्या १०० विद्यार्थिनी यांनी प्रभात फेरीत वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणांसह गांधी भजन गायले. नाशिक पुणे रस्त्यावरून निघालेल्या या प्रभात फेरीत मा आ डॉ सुधीर तांबे ,सौ दुर्गा तांबे डॉ मैथिली तांबे सहभागी झाल्या. या प्रभात फेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर संगमनेर बस स्थानकावर आज रघुपती राघव राजाराम, वैष्णव जनतो, साबरमती के संत या गीतांनी संपूर्ण संगमनेर करांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी शहरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








