क्रीडांगणातूनच जीवनातील विजयाची तयारी होते – सुमित कोल्हे

क्रीडांगणातूनच जीवनातील विजयाची तयारी होते – सुमित कोल्हे
तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

Kopargaon vijay kapse दि ३ ऑक्टोबर २०२६ : क्रीडांगणावर मिळणारे यश-अपयश विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देते. सांघिक खेळातून निर्णयक्षमता, संघभावना, समन्वय व नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे क्रीडांगणातूनच जीवनातील विजयाची खरी तयारी होते, असे प्रतिपादन संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे विश्वस्त व क्रीडापटू सुमित नितीनराव कोल्हे यांनी केले.

जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर व कोपरगाव तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित मुलांच्या तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेत १७ व १९ वर्षे वयोगटातील तालुक्यातील विविध शाळांच्या संघांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन निकम, जिल्हा क्रीडा समितीचे सदस्य अनुप गिरमे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजेंद्र पाटणकर, तसेच विविध शाळांचे क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

सुमित कोल्हे म्हणाले की, खेळातील यश-अपयश हा प्रवासाचा भाग आहे. अपयशातून पुन्हा उभे राहण्याची आणि यश पचविण्याची ताकद खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. सांघिक खेळामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि संघातील खेळाडूंमध्ये समन्वय साधणे हे गुण विकसित होतात. त्यामुळे खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक व सर्वांगीण विकास होतो.विद्यार्थ्यांनी सौहार्दपूर्ण वातावरणात खेळत क्रीडाभावना जपावी आणि आपल्या शाळेसह क्रीडा शिक्षकांचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र देशमुख, सहसचिव सुरेश सोनवणे, रिजवान पठाण, अमोल बोळीज, अशोक गायकवाड, योगेश बिडवे यांच्यासह क्रीडा शिक्षकांनी सहकार्य केले. दरम्यान, तालुका क्रीडा संकुलाच्या प्रशस्त व दर्जेदार मैदानावर स्पर्धेचे आयोजन तसेच खेळाडूंना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थित क्रीडा शिक्षक व खेळाडूंनी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे आभार मानले.



