रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी दिल्ली दरबारी मांडणार : खा. भाऊसाहेब वाकचौरे

रेल्वे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी दिल्ली दरबारी मांडणार : खा. भाऊसाहेब वाकचौरे
रेल्वे अधिकारी व प्रांताधिकाऱ्यांसोबत बैठकीत विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा

Shirdi vijay kapse दि ३ ऑक्टोबर २०२६–शिर्डी-साईनगर ते नाशिक रेल्वे प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी केंद्र सरकारच्या स्तरावर मांडून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.
शिर्डी येथे कोपरगाव व राहाता तालुक्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांची रेल्वे अधिकारी व प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पोहेगाव, चांदेकसारे, सोनेवाडी, बहादराबाद, जवळके, धोंडेवाडी, बहादुरपूर तसेच राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे व डोराळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध अडचणी व मागण्या मांडल्या.

भूसंपादनाच्या गॅझेटमध्ये केवळ अहिल्यानगर जिल्ह्याचा उल्लेख करण्यात आला असून, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील जमिनींचे भूसंपादन एकाच वेळी करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तसेच समृद्धी महामार्गासाठी भूसंपादित जमिनीप्रमाणे वाढीव मोबदला मिळावा, गोदावरी उजवा कालवा व निळवंडे लाभक्षेत्रातील बागायती जमिनींना बागायती जमिनीचा दर्जा देऊन त्यानुसार मोबदला द्यावा आणि बाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा, या मागण्याही करण्यात आल्या. या सर्व मागण्या केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देऊन त्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार वाकचौरे यांनी दिले.

शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे म्हणाले, “आमचा विकासाला विरोध नाही; मात्र प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा, ही माफक अपेक्षा आहे.” प्रांताधिकारी माणिकराव आहेर यांनी बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासह त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. रेल्वे प्रकल्पाधिकारी बी. के. सिंग यांनीही शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन दिले. ॲड. काळे यांनी रेल्वे कायद्यानुसार बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली.
यावेळी रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी बी. के. सिंग, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, बाळासाहेब पवार, मुकुंद सिनगर आदी उपस्थित होते. बैठकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील इतर विविध प्रश्नही नागरिकांनी खासदार वाकचौरे यांच्यासमोर मांडले. संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.



