आपला जिल्हा

दुष्काळाच्या संकटात वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळा – मा. आ. स्नेहलता कोल्हें यांचे आवाहन

दुष्काळाच्या संकटात वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळा – मा. आ. स्नेहलता कोल्हें यांचे आवाहन
कोपरगाव मतदारसंघात पिकांचे मोठे नुकसान, वाढदिवसाचे फ्लेक्स, होर्डिंग्ज लावू नये : स्नेहलता कोल्हे
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ६ ऑक्टोबर २०२६–महाराष्ट्रासह कोपरगाव मतदारसंघात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत ८ ऑक्टोबर रोजी असलेला आपला वाढदिवस मोठ्या स्वरूपात साजरा करणे योग्य ठरणार नसून या पार्श्वभूमीवर मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी यंदा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
मा.आ.स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले की, दरवर्षी आपण सर्वजण अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने माझा वाढदिवस साजरा करता. आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि प्रेमामुळे हा दिवस माझ्यासाठी नेहमीच विशेष असतो. मात्र, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रासह कोपरगाव मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाअभावी शेतकरी बांधव संकटात आहेत. शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले असून, अशावेळी माझा वाढदिवस साजरा करणे योग्य ठरणार नाही.

जाहिरात
सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेबांनी आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या सुख-दुःखाला आपले मानून त्यांच्यासाठी काम केले. त्यांचे विचार आणि संस्कार पुढे नेत असताना, आज तोच शेतकरी संकटात असताना मोठ्या स्वरूपात वाढदिवस साजरा करणे मला योग्य वाटत नाही, असे मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे.
त्यामुळे यंदाच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. फ्लेक्स, होर्डिंग्ज, बॅनर किंवा पोस्टर्स लावू नयेत आणि वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करू नये, अशी त्यांनी विनंती केली आहे.वाढदिवसानिमित्त काही सामाजिक कार्य करावेसे वाटत असेल तर आपल्या इच्छेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी किंवा समाजाच्या उपयोगी पडेल असे काम करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवरात्रीच्या पावन पर्वामध्ये आई जगदंबेच्या चरणी एकच प्रार्थना आहे की, या दुष्काळाच्या संकटातून माझ्या शेतकरी बांधवांना सावरण्याचे बळ आईने द्यावे. त्यांच्या शेतात पुन्हा हिरवाई नांदावी, त्यांच्या कष्टाला सुख-समृद्धीची साथ मिळावी आणि त्यांच्या जीवनात पुन्हा आनंदाचे दिवस यावेत, अशी प्रार्थना मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.आपल्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद आणि मनापासूनच्या सदिच्छा हीच माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट आहे. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च किंवा अनावश्यक आयोजन करू नये,अशी विनंती मा. आ. स्नेहलता कोल्हे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केली आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे