समता पतसंस्थेला एनसीडीसीकडून १०० कोटींचा निधी

समता पतसंस्थेला एनसीडीसीकडून १०० कोटींचा निधी
गुणवत्तापूर्ण कामकाजाची केंद्र शासनाकडून दखल; सोनेतारण कर्जासाठी निधीचा उपयोग
Kopargaon vijay kapse दि ८ ऑक्टोबर २०२६–भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी)च्या माध्यमातून समता नागरी सहकारी पतसंस्थेला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी मंजुरीचे पत्र एनसीडीसी, पुणेचे रिजनल डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री यांच्या हस्ते समता पतसंस्थेच्या संचालक मंडळाला प्रदान करण्यात आले.

संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सांगितले की, गुणवत्तेच्या निकषांवर सहकारी संस्थांच्या कामकाजाचे परीक्षण करून एनसीडीसीकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. समता पतसंस्थेला मिळालेल्या या निधीचा विशेषतः सोनेतारण कर्जवाटपासाठी उपयोग केला जाणार आहे.
समता पतसंस्थेने गेल्या ४० वर्षांत केलेली गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढ आणि महाराष्ट्रातील अन्य सहकारी पतसंस्थांना दिलेले मार्गदर्शन यामुळे हा निधी मिळाला असून, समताचे काम इतर सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे गिरीराज अग्निहोत्री यांनी सांगितले. सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी इतर पतसंस्थांनीही समताचा आदर्श घेऊन गुणवत्तापूर्ण व्यवसायवाढीवर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेचे व्हा. चेअरमन अरविंदभाई पटेल म्हणाले की, कठोर थकबाकी वसुली, गेल्या तीन वर्षांत सोनेतारण कर्जवाटपात झालेली लक्षणीय वाढ आणि ग्राहकांचा संस्थेवरील विश्वास या बाबींमुळे संस्थेला हा निधी प्राप्त झाला आहे. निधीचा योग्य वापर करून संस्थेला आणखी उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला जाईल.

समता पतसंस्थेच्या गुणवत्तापूर्ण कामकाजासोबतच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक उपक्रमांचेही अग्निहोत्री यांनी कौतुक केले. समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम, वसुली पॅटर्न, कॉल सेंटर, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, समता सहकार उद्योग मंदिर आणि व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली याबाबत त्यांनी माहिती घेतली. अशा उपक्रमांचा इतर सहकारी संस्थांनीही अवलंब करावा यासाठी एनसीडीसी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.
समता पतसंस्थेचे काम केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशातील सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरत आहे. सर्वसामान्यांना सहकारी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या समताच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.
संस्थेचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड म्हणाले की, एनसीडीसीकडून मिळालेला १०० कोटींचा निधी हा समताने गेल्या ४० वर्षांत संपादन केलेल्या ग्राहकांच्या विश्वासाची महत्त्वपूर्ण पावती आहे. या निधीचा उपयोग संस्थेच्या प्रगतीसोबतच सहकार क्षेत्राच्या विकासासाठी केला जाईल.
‘सहकार बास्केट’मधून मिनी ॲमेझॉन उभारणार
काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्था ‘सहकार बास्केट’च्या माध्यमातून मिनी ॲमेझॉन उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हा उपक्रम राष्ट्रीय सहकार विकास निगमाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे रिजनल डायरेक्टर गिरीराज अग्निहोत्री यांनी सांगितले.
यावेळी व्हा. चेअरमन अरविंद पटेल, ज्येष्ठ संचालक जितुभाई शहा, कचरू मोकळ, संचालक संदीप कोयटे, दीपक अग्रवाल, गिरीश सोनेकर, संचालिका श्वेता अजमेरा, अक्षरा पटेल, स्वाती कोयटे, समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुहासिनी कोयटे, सरव्यवस्थापक सचिन भट्टड तसेच मुख्य कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.




