संजीवनीचे विश्वस्त सुमित कोल्हे यांना ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’

संजीवनीचे विश्वस्त सुमित कोल्हे यांना ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; ‘संजीवनी पॅटर्न’वर मान्यतेची मोहोर
Kopargaon vijay kapse दि ९ ऑक्टोबर २०२६: शिक्षण म्हणजे केवळ गुण, पदवी किंवा परीक्षेतील यश नसून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना आत्मविश्वासू, सक्षम आणि जबाबदार नागरिक घडविण्याची प्रक्रिया आहे. याच व्यापक शैक्षणिक दृष्टिकोनातून कार्यरत असलेल्या संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित नितीनराव कोल्हे यांची प्रतिष्ठित ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ESFE आणि द टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदान करण्यात येणारा हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावरील दखल मानली जात आहे.

सुमित कोल्हे यांच्या पुढाकारातून संजीवनी समूहात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, डिजिटल क्लासरूम, अत्याधुनिक प्रयोगशाळा, कौशल्यविकास, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सहकार्य अशा विविध क्षेत्रांत संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे. गुणवत्तेसोबत कौशल्य आणि संस्कार’ या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना घडविण्यावर संजीवनी समूहाचा भर आहे. कला, क्रीडा, तंत्रज्ञान, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे संजीवनीचे विद्यार्थी केवळ परीक्षेतील गुणवत्तेपुरते मर्यादित न राहता जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील यशाची परंपरा
संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील बँड स्पर्धेत मिळविलेले उल्लेखनीय यश, तसेच गुजरातमधील आनंदनगर येथे राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सहभागी होण्याचे मिळालेले निमंत्रण, हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचे ठळक उदाहरण ठरले आहे. शिस्त, संघभावना, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांसारखी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या संस्थेच्या प्रयत्नांना या यशामुळे अधोरेखित झाले आहे.
संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांचे मार्गदर्शन आणि कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांचा पाठिंबा यामुळे संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांना सातत्यपूर्ण दिशा मिळत आहे. गुणवत्ता, पारदर्शक प्रशासन, उच्च शैक्षणिक आदर्श, शिक्षक-विद्यार्थी कल्याण आणि समाजाभिमुख कार्य या मूल्यांच्या आधारावर संजीवनी समूहाने शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक शिक्षण, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि व्यापक संधी उपलब्ध करून देणे, हा संजीवनी समूहाच्या शैक्षणिक वाटचालीचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि आवडी ओळखून त्यांना योग्य व्यासपीठ देण्याच्या या प्रयत्नांना ‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’च्या रूपाने राष्ट्रीय पातळीवर मिळालेली दखल महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील NESCO, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुमितदादा कोल्हे यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन व्यक्त होत असून, हा सन्मान संजीवनी समूहाच्या आगामी शैक्षणिक उपक्रमांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुरस्कार हा केवळ सन्मान नसून, प्रयत्नांना मिळालेली प्रेरणा आहे
“‘स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६’साठी माझी निवड होणे ही आनंदाची आणि त्याचवेळी जबाबदारीची जाणीव करून देणारी बाब आहे. हा सन्मान मी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे आदी सर्व कुटुंबीय, संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, प्रशिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सामूहिक प्रयत्नांना समर्पित करतो.
आमच्या दृष्टीने शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळवून देणे एवढाच नसून, त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त, संवेदनशीलता, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करणे हा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष क्षमता असते. त्या क्षमतेला योग्य दिशा, सुविधा आणि प्रोत्साहन मिळाले तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात.
संजीवनी समूहात शिक्षणासोबत कला, क्रीडा, तंत्रज्ञान, कौशल्यविकास आणि सामाजिक जाणीव यांना महत्त्व देण्यामागे हाच विचार आहे. विद्यार्थ्यांना बदलत्या काळातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे. हा पुरस्कार आम्हाला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देईल. भविष्यातही गुणवत्तापूर्ण, मूल्याधिष्ठित आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणासाठी आमचे प्रयत्न अधिक व्यापक करण्याचा आमचा संकल्प आहे.”
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित नितीनराव कोल्हे



