एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला डॉ. जयश्री थोरात यांचा ठाम पाठिंबा

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला डॉ. जयश्री थोरात यांचा ठाम पाठिंबा
दोषींवर जबाबदारी निश्चित करून राजीनामा घ्यावा; “समाजातील आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचा आहे”
Sangmner vijay kapse दि १० ऑक्टोबर २०२६ : एमपीएससीच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी भेट देत ठाम पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, “तुम्ही देत असलेला लढा हा तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. महाराष्ट्राला पुढे नेण्याची ताकद तुमच्यातच आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत दोषींवर जबाबदारी निश्चित करून त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असून, या आंदोलनाने आता चळवळीचे स्वरूप घेतले आहे. आमदार रोहित पवार, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यासह विविध नेते व कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी प्रयत्नशील आहेत. या आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांनी भेट दिली. यावेळी संगमनेरमधील सुमारे ५० युवक कार्यकर्ते त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. थोरात म्हणाल्या की, आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झाले तरी घाबरू नका; ते आपल्यासाठी मेडल समजा. आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढताना कोणत्याही दबावाला बळी पडू नका. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थिनींचे त्यांनी विशेष कौतुक केले. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मुलींना अनेक सामाजिक व कौटुंबिक आव्हानांना सामोरे जावे लागते. असे असतानाही त्या आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभ्या आहेत. त्यामुळे पालकांनी आणि समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा दाखला देत त्यांनी विद्यार्थ्यांना संघर्षाची प्रेरणा दिली. संत, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हीच परंपरा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकजूट कायम ठेवून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
“आपल्याला समाजातला आणि आयोगातला ब्लड कॅन्सर बरा करायचा आहे,” असे स्पष्ट विधान करत डॉ. जयश्री थोरात यांनी परीक्षा व आयोगाच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन दोषींवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
माजी महसूल व शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी आमदार रोहित पवार, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार अंबादास दानवे, शिवराज मोरे, विवेकानंद पाटील, प्रियंका, डॉ. ओंकार यांच्यासह विविध मान्यवर आणि युवक कार्यकर्ते उपस्थित होते.




