आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना पहिली उचल ३२०० रुपये देणार-आ.आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना पहिली उचल ३२०० रुपये देणार–आ.आशुतोष काळे

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रम संपन्न  

Kopargaon vijay kapse दि ११ ऑक्टोबर २०२६ :- कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपले आहे. त्यांची शिकवण माजी आमदार अशोकराव काळे यांनी पुढे सुरु ठेवली.त्याच आदर्श विचारांवर आपली वाटचाल सुरु असून ऊस दराच्या बाबतीत कोण काय निर्णय घेईल याची वाट न पाहता दुष्काळी परिस्थिती आहे, शेतकरी अडचणीत आहेत याचा विचार करून २०२६-२७ च्या गाळप हंगामात गाळपाला येणाऱ्या ऊसाला पहिली उचल प्र.मे.टन रुपये ३,२००/-देणार व जानेवारी नंतर गाळपास येणाऱ्या ऊसाला देखील विशेष अनुदान देणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी जाहीर केले.यावेळी उपस्थित सभासद शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत करून दुष्काळी परिस्थितीची दखल घेवून विशेष अनुदान जाहीर केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले.

जाहिरात

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या ७२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार (दि.११) रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.

जाहिरात

ते पुढे म्हणाले की, राज्य शासनाने जरी १५ ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरु करण्यास सांगितले असले तरी परिस्थिती अनुकूल नव्हती.ऊसाची वाढ न झाल्यामुळे अपेक्षित रिकव्हरी मिळणार नाही त्यामुळे शेतकरी आणि कारखाना दोघांचेही नुकसान होणार असल्यामुळे ऊस अधिक परीपक्व व्हावा व गळीत हंगाम १५ ऑक्टोबर ऐवजी १५ नोव्हेंबर नंतरच सुरु व्हावा असे वाटत होते.परंतु पावसाच्या बाबतीत हवामान विभागाकडून देण्यात येणारी माहिती आणि वाढलेली उष्णता पाहता पुढे आणखी अडचणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे १५ ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरु करण्याचा निर्णय योग्य वाटतो. चालूवर्षी एल निनोचे सावट असल्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात फक्त जुलै महिन्यातच पाऊस पडला याउलट मागील वर्षी मे पासून नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे मागच्या आणि चालू हंगामात परस्पर विरोधी परिस्थिती आहे. राज्य सरकारने ३५८ पैकी २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांत ट्रिगर-१ लागु झाला असून दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर योग्य त्या उपाय योजना देखील तात्काळ सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा.पाण्याची उपलब्धता लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यावर्षी कमी वाढ झालेल्या उसाचे खोडवे राखून पुढील वर्षी गाळपासाठी पीक उपलब्ध होईल, याकडे लक्ष द्यावे. नवीन उसाची लागवड करून कमी पाण्याचा वापर करावा व अधिक उत्पादन घेण्यावर भर द्यावा.ऊस पिक वाचवण्यासाठी शेतात आधुनिक सिंचन प्रणालीचा वापर करून ऊस पाचटाचे आच्छादन करावे, ए-आय तंत्रज्ञानाचा आधार घेवून ठिबक सिंचन, स्प्रिंकलर यांचा वापर वाढवावा असे आवाहन केले.गोदावरी कालव्यांचे दोन रोटेशन देण्यात येणार असल्याचे जलसंधारण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी सुतोवाच केलेले असले तरी प्रत्यक्षात पुढील परिस्थिती कशी असेल हे आज सांगता येणार नाही.

जाहिरात

त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी पहिली उचल जरी प्र.मे.टन रुपये ३,२००/-देण्यात येणार असली तरी १ ते १५ जानेवारी दरम्यान गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन रुपये १००/-, १६ ते ३१ जानेवारी दरम्यान गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन रुपये १५०/-,१ ते १५ फेब्रुवारी दरम्यान गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन रुपये २००/-आणि त्यानंतर गाळपाला येणाऱ्या ऊसाला प्र.मे.टन रुपये २५०/- विशेष अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देवून कर्मवीर शंकरराव काळे यांनी घालून दिलेल्या आदर्शांचा वारसा जपत, माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळाच्या कठीण परिस्थितीचा सर्वांच्या सहकार्याने धैर्याने सामना करून अधिकाधिक ऊस गाळप करून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करू असे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

       याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र जाधव,पद्माकांत कुदळे,बाळासाहेब कदम,नारायणराव मांजरे, ज्ञानदेव मांजरे,बाबासाहेब कोते,संभाजीराव काळे,सोमनाथ चांदगुडे, बाळासाहेब जपे,संचालक प्रवीण शिंदे, सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, राजेंद्र घुमरे, शंकरराव चव्हाण, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप,वसंतराव आभाळे,प्रशांत घुले, सौ.वत्सलाबाई जाधव,सौ.इंदूबाई शिंदे, गंगाधर औताडे, श्रावण आसने,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केनचे कार्यकारी संचालक सुभाष गवळी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे,आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि.सेक्रेटरी संदीप शिरसाठ,चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, पदाधिकाऱ्यांसह सभासद, शेतकरी, कर्मचारी, व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे यांनी केले तर उपाध्यक्ष दिनार कुदळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

           

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे