दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचले बाळासाहेब थोरात; सरकारला घोषणांऐवजी अंमलबजावणीचा इशारा

दुष्काळग्रस्तांच्या बांधावर पोहोचले बाळासाहेब थोरात; सरकारला घोषणांऐवजी अंमलबजावणीचा इशारा
“पंचनाम्यात वेळ घालवू नका; सरसकट शेतकऱ्यांना भरीव मदत द्या” — बाळासाहेब थोरात
पिण्याचे पाणी, चारा, रोजगाराचा प्रश्न गंभीर; रात्री दिल्लीहून परतताच सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर

Sangmner vijay kapse दि १४ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दुष्काळाची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा व पाणी, शेतमजुरांचा रोजगार अशा अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. सरकारने आता पंचनाम्यांमध्ये वेळ न घालवता सरसकट सर्व दुष्काळग्रस्तांना भरीव मदत करावी. सरकारकडून केवळ घोषणाबाजी सुरू असून, आता घोषणा नकोत तर प्रत्यक्ष निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

पठार भागातील हिवरगाव पठार, जांभुळवाडी, मांडवे, बिरेवाडी, कवठे मलकापूर, सुळकेवाडी, चौधरवाडी, कणसेवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, रणखांब व पिंपळगाव देपा या गावांमध्ये जाऊन बाळासाहेब थोरात यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. सोयाबीन, भुईमूग, बाजरी आदी पिकांची पाहणी करत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना दिलासा दिला.

यावेळी सभापती शंकरराव खेमनर, बाळासाहेब सागर, सौ. मीराताई शेटे, जयराम ढेरंगे, सुजित खेमनर, सुदाम सागर, शिवाजी साकुरे, शशिकांत बेरड, लक्ष्मण गीते, पांडुरंग सागर, बाबासाहेब भोसले, भास्कर कारंडे, निवृत्ती गि-हे, राहुल गंभीरे, रोहिदास मुंडे, भाऊसाहेब गांजवे, जाकीर मोमीन, पोपट घाडगे, के. के. पावडे, सरपंच हौशीराम खेमनर, तुकाराम गुळवे, साहेबराव बारवे, नाना गुळवे यांच्यासह कार्यकर्ते व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, अल निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून ग्रामीण महाराष्ट्र अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे. हाताशी आलेली पिके करपून गेली आहेत. सोयाबीन काढण्याचीही परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे यंदा शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे. चारा उपलब्ध नसल्याने पशुधनाच्या संगोपनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा यासोबतच हातावर पोट असलेल्या अनेक शेतमजुरांवरही दुष्काळाचे संकट आले आहे. काम उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर दोन वेळच्या अन्नाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा सर्व नागरिकांना शासनाने तातडीने मदत करावी. शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. पाणी व चाऱ्याची व्यवस्था करावी. त्याचबरोबर पंचनाम्यांमध्ये वेळ न घालवता सरसकट मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामीण भागातील गावांमध्ये अनेक अकुशल कामगार असून, त्यांचे मागील सहा महिन्यांपासून पगार शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. इतकेच नव्हे तर संजय गांधी निराधार योजनेचे पैसेही मागील सहा महिन्यांपासून नागरिकांना मिळालेले नाहीत, अशी स्थिती असल्याचे थोरात यांनी सांगितले.
“हातावर पोट असलेल्या नागरिकांचे पैसे सरकार देऊ शकत नसेल तर हे सरकार कुचकामी ठरले आहे. घोषणा मात्र मोठमोठ्या केल्या जात आहेत. आता निव्वळ घोषणा नकोत; निर्णय घ्या, तातडीने अंमलबजावणी करा आणि राज्यातील शेतकरी व दुष्काळग्रस्तांना भरीव मदत द्या,” अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.
यावेळी सभापती शंकर पा. खेमनर म्हणाले की, राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सध्या केवळ बैठकींमध्ये पदाधिकारी व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही ठोस मदत मिळत नाही. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीसह दुष्काळ व अतिवृष्टीच्या काळात मोठी मदत दिली जात होती. पिकविम्याचीही मदत मिळत होती. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत संगमनेर तालुका पुढे असायचा; मात्र आता याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या धोरणांचे चटके बसू लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.
जयराम ढेरंगे म्हणाले की, परिस्थिती कोणतीही असो, लोकनेते बाळासाहेब थोरात हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. हाच मोठा दिलासा पठार भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना आहे.
यावेळी बाळासाहेब थोरात यांनी शेतकरी, महिला व युवकांशी संवाद साधला. अनेक महिलांनी आपल्या व्यथा मांडताना भावनिक होत डोळ्यांत अश्रू आणले. “साहेब, तुम्हीच आता आम्हाला वाचवा. हे सरकार काही कामाचे नाही. साहेब, तुम्हीच आमचे सरकार आहात,” अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. त्यावर थोरात यांनी महिला व नागरिकांना धीर देत, “आपण तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्यासाठी सातत्याने संघर्ष करू,” असा दिलासा दिला.

शेतकरी नेता दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते म्हणून राज्याला परिचित असलेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी दिल्ली येथे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. यापूर्वी राज्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी त्यांनी सातत्याने मागणी केली होती. संगमनेर येथे मोठा मोर्चाही काढण्यात आला. त्यानंतर राज्यात दुष्काळ जाहीर झाला.
मुंबईतील ठाकरे बंधूंच्या मोर्चापासून पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनापर्यंत आणि दिल्लीतील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनापर्यंत सहभाग घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात रात्री उशिरा दिल्लीहून परतले. मात्र, विश्रांती न घेता सकाळी आठ वाजताच ते पठार भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. त्यामुळे दुष्काळाच्या संकटातही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांच्या या दौऱ्याची चर्चा होत आहे.



