आपला जिल्हा

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त टँकरची तरतूद करा – आ. आशुतोष काळे

 संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त टँकरची तरतूद करा – आ. आशुतोष काळे

संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त टँकरची तरतूद करा – आ. आशुतोष काळे

Kopargaon vijay kapse दि १३ ऑक्टोबर २०२६ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार करताना गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची गावे वगळता तालुक्यातील इतर सर्व गावांना जास्तीत जास्त टँकर वेळेत उपलब्ध होतील, अशा पद्धतीने नियोजन करावे. तसेच गोदावरी कालव्यांना वेळेत आवर्तन न मिळाल्यास लाभक्षेत्रातील गावांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे सर्व संभाव्य परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पिण्याच्या पाण्यासाठी जास्तीत जास्त टँकर उपलब्ध होतील, अशी तरतूद आराखड्यात करावी, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या.

जाहिरात

कोपरगाव तालुक्यात यंदा अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार आशुतोष काळे यांनी शासनदरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव मतदारसंघ दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला असून ट्रिगर-१ लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतीपिकांचे पंचनामे करून तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आराखडा तयार करण्यात येत आहे. या अनुषंगाने आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

जाहिरात

जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे भविष्यातील संकटाची चाहूल लागली होती. मात्र, जुलै महिन्यात काहीसा समाधानकारक पाऊस झाला. तसेच धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे गोदावरी नदीला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी कालव्यांना सोडण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनुसार कालव्यांना पाणी सोडण्यात आल्याने तालुक्यातील बंधारे, गाव तलाव आणि पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते.

जाहिरात

मात्र, ऑगस्ट, सप्टेंबर आणि आता निम्मा ऑक्टोबर महिना संपत आला असून पाऊस होण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. सध्या काही प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असला तरी भविष्यात गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांची गावे वगळता तालुक्यातील इतर सर्व गावांना टँकर सुरू करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे या गावांना जास्तीत जास्त टँकर उपलब्ध होतील, अशी तरतूद पाणीटंचाईच्या आराखड्यात करण्यात यावी, अशी मागणी आ. काळे यांनी केली.

जाहिरात

तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने भूजल पातळी खालावत चालली आहे. त्याचबरोबर बाष्पीभवनाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गोदावरी कालव्यांना वेळेत आवर्तन मिळाल्यास कालव्यांच्या लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या गावांना पाण्याची अडचण निर्माण होणार नाही, असे सध्या वाटत असले तरी पुढील परिस्थिती कशी असेल, याचा आजच अंदाज बांधता येणार नाही.

त्यामुळे यदाकदाचित गोदावरी कालव्यांना वेळेवर आवर्तन मिळाले नाही, तर लाभक्षेत्रातील गावांनाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागू शकतो. या संभाव्य परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन त्याबाबतही आराखड्यात नियोजन करावे आणि शासनाकडे जास्तीत जास्त टँकरची तरतूद करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे